विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार रामदास बारोटे उभे असतांना कांॅग्रेसने या मतदारसंघात निवडणूक लढण्याचा निर्णय घेऊन प्रकाश तायडे यांना उमेदवारी दिल्यामुळे आम्ही अर्थात, विमाशिसंने नागपूर पदवीधर मतदारसंघात उभ्या असलेले कांॅग्रेस उमेदवार प्राचार्य बबन तायवाडे यांना पाठिंबा न देता तटस्थ भूमिका घेऊन सदस्यांनी स्वविवेकाने मतदानाचा निर्णय घ्यावा, असा निर्णय घेतल्याचे विमाशिसंचे सरकार्यवाह माजी आमदार विश्वनाथ डायगव्हाणे यांनी येथे सांगितले. विमाशिसंचे उमेदवार रामदास बारोटे यांच्या निवडणूक प्रचारार्थ यवतमाळ जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आले असतांना डायगव्हाणे यांनी विमाशिसंची नागपूर पदवीधर मतदारसंघात घेतलेली भूमिका स्पष्ट केली.
उल्लेखनीय म्हणजे, आतापर्यंत कॉंग्रेसचा नागपूर आणि अमरावती, अशा दोन्ही विभागात पदवीधर आणि शिक्षक अशा मतदारसंघात विमाशिसंच्या व नुटाच्या उमेदवारांना पाठिंबा राहत असे. यावेळी मात्र कांॅग्रेसने दोन्ही विभागात अनुक्रमे बबन तायवाडे व प्रकाश तायडे यांना उभे केले आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपने अनिल सोले यांना, तर कांॅग्रेसने बबन तायवाडे यांना उमेदवारी दिली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात कॉंग्रेसने प्रकाश तायडे यांना, भाजपने उमेदवार उभा न करता महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक परिषदेचे उमेदवार श्रीकृष्ण अवचार यांना पाठिंबा दिला आहे. विमाशिसंचे रामदास बारोटे हे अधिकृत उमेदवार उभे असले तरी विद्यमान आमदार आणि विमाशिसंचे अध्यक्ष वसंतराव खोटेरे हेही विजयाची हॅटट्रीक करण्यासाठी लढत आहे. विशेष बाब ही की, आतापर्यंत वसंतराव खोटरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून पाठिंबा देणाऱ्या नुटाने मात्र तटस्थ भूमिका घेत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नाव सांगणाऱ्याा या गटाच्या किंवा त्या गटाच्या कोणत्याही उमेदवाराला पसंतीचा कोणताही क्रमांक विद्यापीठ आणि महाविद्यालयीन प्राध्यापकांनी देऊ नये असा ठराव केला आहे.
नुटा सदस्यांनी आत्म्याचा आवाज ऐकून उर्वरित उमेदवारांमधून शिक्षक आणि विद्यार्थी हितासाठी झटू शकेल, अशा उमेदवाराला मतदान करावे, असेही नुटाने ठरावात म्हटले आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे, नुटाच्या कार्यकारी मंडळाने विधान परिषद निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेतून रामदास बारोटे यांचा नावाचा उल्लेख न करता विमाशिसंचे अधिकृत उमेदवार रामदास बारोटे असल्याचे ध्वनित केले आहे. नुटाने म्हटले आहे की, विमासिसंच्या कार्यकारी मंडळाच्या बठका होत आहेत. अशा विमाशिसंच्या अधिकृत उमेदवारांशी सहकार्य करणे ही वेगळी गोष्ट आहे. एखाद्या मेळाव्याने ठरविलेल्या उमेदवारांशी कायदा व नियमांनी ज्यांचे अस्तित्व अमान्य केले आहे अशा कार्यकारी मंडळाने ठरविलेल्या उमेदवारांशी सहकार्य करण्याचा निर्णय नुटा घेऊ शकत नाही. नुटाने आमदार वसंतराव खोटरे  याचेही नाव देण्याचे टाळले आहे. आमदार खोटरे यांची उमेदवारी विमाशिसंच्या कार्यकारी मंडळात ठरली नाही, तर ती शिक्षकांच्या मेळाव्यात ठरली आहे. हे लक्षात घेतले, तर नुटाने विमाशिसंच्या बाबतीत नकारात्मक भूमिका घेतली असली तरी रामदास बारोटे हेच विमाशिसंचे अधिकृत उमेदवार असल्याचे ध्वनित केल्याची प्रतिक्रिया माजी आमदार विश्वनाथ डायगव्हाणे गटाच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ उमेदवार उभे असून २ लाख ८७ हजार पदवीधरांना, तर अमरावती शिक्षक मतदारसंघातील १७ उमेदवारामध्ये ‘लोकभारती’ वर्षां निकम या एकमेव महिला उमेदवार असून ४४ हजार शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.