अहिल्यानगरः राज्यात प्रथमच ग्रामीण भागात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. ही बाब अहिल्यानगर जिल्ह्यासाठी भूषणावह आहे. प्रशासनामार्फत या बैठकीचे काटेकोर नियोजन करण्यात आले असून, यंत्रणांनी त्यांना देण्यात आलेल्या सूचनांची शिस्तबद्ध अंमलबजावणी करावी. दिलेली जबाबदारी चोखपणे बजावत बैठक यशस्वीपणे पार पाडावी, असे निर्देश विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. बैठकीसाठी येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
चौंडी (ता. जामखेड) येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतला. त्या प्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, निवासी उपजिल्हाधिकारी अरुण उंडे आदी उपस्थित होते.
सभापती राम शिंदे म्हणाले, ‘चौंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी प्रशासनाने अत्यंत सूक्ष्मपणे व काटेकोरपणे नियोजन केले आहे. बैठकीसाठी विविध समित्यांची स्थापना करून अधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप केले आहे. प्रत्येक अधिकाऱ्याने एकसंघपणे काम करत दिलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडावी. चौंडीकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांना दिशादर्शक फलक लावावेत. बैठकीसाठी मंत्रिमंडळाबरोबरच सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे वाहनांसाठी पुरेशा प्रमाणात पार्किंगची व्यवस्था करावी. परिसरामध्ये अनावश्यक गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी केल्या.
बैठकस्थानी वैद्यकीय पथक तैनात करावे. रुग्णवाहिका, तात्पुरते रुग्णालय उभारण्याबरोबरच पुरेशा प्रमाणात औषधी व मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्निशामक यंत्रणाही ठेवण्यात यावी. परिसरामध्ये स्वच्छता राहील याची काळजी घेण्यात यावी. बैठकीच्या दिवशी विद्युतपुरवठा सुरळीत व अखंडित राहील, या दृष्टीनेही आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रा. शिंदे यांनी या वेळी दिल्या.
चौंडी येथे बैठकीसाठी करण्यात येत असलेल्या व्यवस्थेची सभापती राम शिंदे यांनी प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. बैठकीसाठी उभारण्यात येत असलेला कक्ष, माध्यम कक्ष, भोजन कक्ष, सचिवालय कक्ष, ग्रीनरूम, हेलिपॅड, तसेच पार्किंग व्यवस्थेची पाहणी करत व्यवस्थेमध्ये कुठलीही त्रुटी राहणार नाही, तसेच हे काम विहित वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी या वेळी दिल्या.