राजापूर : मांजराचा पाठलाग करताना मांजरासह सांड पाण्यासाठी बांधण्यात आलेल्या सिमेंटच्या टाकीमध्ये पडून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना रायपाटण टक्केवाडी येथे घडली. टाकीतील पाण्यात गुदमरून बिबट्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्याचे राजापूर वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

टाकीत पडलेला बिबट्या सुमारे अडीज ते तीन वर्षाचा मादी जातीतील असून शवविच्छेदनानंतर वन विभागाच्या वतीने त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवार १० ऑगस्टला सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास रायपाटण, टक्केवाडी येथील रामचंद्र बाळकृष्ण रोडे यांच्या घराजवळ सांडपाण्यासाठी बांधण्यात आलेल्या सिमेंटच्या टाकीमध्ये बिबटया मृत अवस्थेत पडला असल्याची  माहिती टक्केवारी  पोलीस पाटील  मृन्मयी पांचाळ यांनी परिमंडळ वन अधिकारी राजापूर यांना दूरध्वनी वरून दिली. त्यांनी या घटनेची माहिती परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना देखील दिली.

हेही वाचा…Amit Shah : “हर्षवर्धन नेहमी माझी कॉलर पकडून म्हणतो…”, अमित शाहांनी सांगितला किस्सा; म्हणाले, “हा तुमचा वकील…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर  वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी दाखल झाले. व त्यांनी पाहणी केली असता, बिबट्या हा घराच्या बाजूलाच  सांडपाण्यासाठी बांधण्यात आलेल्या टाकीमध्ये असलेल्या पाण्यात मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या बाजूलाच ज्या भक्षाचा त्याने पाठलाग केला होता, ते मांजर देखील मृत होऊन पडले होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या बिबट्याला दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले. त्यानंतर मृत बिबटयाची रीतसर तपासणी करण्यात आली. त्याच्या शरीराचे सर्व अवयव सुस्थेतीत होते. मृत बिबट्या हा मादी  असून त्याचे  वय अडीच ते तीन वर्ष असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तर पशुधन विकास अधिकारी प्रभास किनरे यांचे मार्फत  शवविच्छेदन करण्यात आले.  टाकीत असलेल्या पाण्यात गुदमरून  बिबटयाचा मृत्यू झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी राजापूर यांनी सांगितले.