दापोली : खेड तालुक्यातील नांदगाव (खरी) परिसरात अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक बिबट्या मृत्यूमुखी पडल्याची घटना उघडकीस आली आहे. मध्यरात्री ही घटना घडली असावी अशी शक्यता व्यक्त केले जात आहे. रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांना रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह दिसताच त्यांनी तत्काळ ही बाब खेड पोलिसांना आणि वनविभागाला कळवली.

या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत बिबट्याला पंचनामा करून खेड शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले.

पशुधन विकास अधिकारी डॉ. शुंभगी मोरे यांनी सांगितले की, बिबट्याचे शवविच्छेदन व्यवस्थित पार पडले असून बिबट्याची कातडी, नखे आणि शरीरातील सर्व अवयव सुस्थितीत आहेत. त्यामुळे अवैध शिकारीचा किंवा अवयव काढून घेण्याचा कोणताही प्रकार झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नैसर्गिक व्यवस्थेनुसार व वन्यजीव संरक्षणाच्या नियमांनुसार बिबट्याचे दहन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. मोरे यांनी दिली.