साकोली तालुक्यातीला जांभळी-खांबा येथील केमाई बावणे या महिलेला १ नोव्हेंबरच्या पहाटे बिबटय़ाने ठार केल्यानंतर पुन्हा मानव-वन्यप्राण्यांमधील संघर्षांला तोंड फुटले आहे. केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी,‘वन्यप्राण्यांना मारू नका, त्यांचे संरक्षण करा,’ असे स्पष्ट आदेश वनाधिकाऱ्यांना दिले असतानाच साकोली व पवनी तालुक्यात हैदोस घातणारा बिबटय़ा जेरबंद झाला नाही, तर त्याला ठार मारा, अशा स्पष्ट सूचना खासदार नाना पटोले यांनी दिल्याने आदेश नेमके कुणाचे पाळायचे, अशा संभ्रमात या जिल्ह्य़ातील वनाधिकारी सापडले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून साकोली आणि पवनी तालुक्यात बिबटय़ाने दोघांना जखमी करून एका वृद्धेचा बळी घेतल्याने लोक संतप्त झाले आहेत. तसेच गेल्या काही वर्षांंत भारतात वन्यप्राण्यांचा विशेषत वाघांच्या शिकारीत प्रचंड वाढ झाली. वाघांच्या कातडीच्या तस्करीचीही अनेक प्रकरणे उजेडात आली आहेत. खुद्द भंडारा जिल्ह्य़ातच या प्रकरणी कित्येक आरोपी अडकले. वन्यप्राण्यांना ठार मारण्याची जणू देशात स्पर्धाच लागलेली असतानाच केंद्रीय वने व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी वन्यप्राण्यांच्या संरक्षणावर भर देऊन त्यांना ठार मारले जाऊ नये, अशी ठाम भूमिका घेतली आहे. ‘सेव्ह टायगर’ ही मोहीम देशभर पोचावी याकरिता गेल्या आठवडय़ात मंत्रालयातर्फे जावडेकरांनी एक प्रदर्शनही भरविलेले होते.

दरम्यान, खासदार नाना पटोले यांनी सोमवार, ३ नोव्हेंबरला जांभळी-खांबाला भेट देऊन मृत केमाई बावणे हिच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. ‘जिल्ह्य़ात सध्या धान कापणीचा हंगाम सुरू असल्याने स्त्री-पुरुषांना घराबाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नाही, परंतु या परिसरातील बिबटय़ाच्या हैदोसामुळे गावकऱ्यांमध्ये दहशत असल्याने त्यांची कामे खोळंबली असून रोजगारही बुडत आहे. ही स्थिती पाहता, बिबटय़ाला तातडीने जेरबंद करा. येत्या दोन दिवसात बिबटय़ा अडकला नाही, तर त्याला ठार मारा. मात्र, कोणत्याही परिस्थितीत लोकांचे जीव जाता कामा नये,’ अशा स्पष्ट सूचना त्यांनी भंडारा जिल्ह्य़ातील वनाधिकाऱ्यांना दिल्या. एकीकडे केंद्रीयमंत्री व्याघ्र संरक्षणाची भाषा करतात, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या खासदाराने बिबटय़ा जेरबंद झाला नाही तर त्याला ठार मारा, अशी सूचना वनाधिकाऱ्यांना दिल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. बिबटय़ाने मानवासह पाळीव जनावरांचाही फडशा पाडला तर गावकऱ्यांचा रोष, त्याला वेळीच जेरबंद केले नाही किंवा ठार केले नाही, तर खासदारांचा रोष आणि ठार मारले, तर केंद्रीय मंत्र्यांचा रोष, अशा कात्रीत वन्यजीव विभाग अडकला आहे.