जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर संतापलेल्या एका आरोपीने न्यायाधीशांच्या दिशेने बूट भिरकावल्याचा प्रकार पंढरपूरच्या अपर सत्र न्यायालयात घडला. सुदैवाने भिरकावलेला बूट न्यायाधीशांना लागला नाही. अनिल पवार (रा. पंढरपूर) असे या आरोपीचे नाव आहे.
पंढरपुरात क्षुल्लक कारणावरून झालेल्या एका खून प्रकरणात पंढरपूरच्या सत्र न्यायालयाने अनिल पवार याच्यासह सुनील पवार व भीमा शिंगाडे या तिघा आरोपींना दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर संतापलेल्या आरोपींपैकी अनिल पवार याने स्वत:च्या पायातील बूट काढून अपर सत्र न्यायाधीश स्मिता कडू यांच्या दिशेने भिरकावला. परंतु भिरकावलेला बूट न्यायाधीशांना लागला नाही. या घटनेनंतर पोलिसांनी  अनिल पवार याच्यासह अन्य दोघा दोषी व शिक्षा झालेल्या आरोपींना ताब्यात घेतले.
अनिल पवार व इतरांचे हरिभाऊ मराठे यांच्याबरोबर भांडण होऊन यात आरोपींनी मराठे यांना लाथाबुक्क्य़ांनी बेदम मारहाण केली होती. यात ते गंभीर जखमी होऊन मरण पावले. याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
 या खटल्याची सुनावणी अपर सत्र न्यायाधीश स्मिता कडू यांच्यासमोर होऊन त्यांनी तिघा आरोपींना दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. याप्रकरणी सरकारतर्फे अ‍ॅड. ए.डी.भोसले यांनी काम पाहिले, तर मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. विजय भोसले आणि आरोपींतर्फे अ‍ॅड. डी. व्ही. जहागिरदार यांनी बाजू मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life sentence prisoner hurls footwear at judge
First published on: 30-03-2014 at 04:05 IST