करमाळा-इंदापूर तालुक्याच्या सीमेवर उजनी जलाशयात वादळी वारे आणि वावटळीमुळे बोट पालथी होऊन त्यात करमाळा भागातील सहा प्रवासी पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची दुर्घटना ताजी असतानाच बुधवारी दुस-या दिवशी करमाळा तालुक्यात पुन्हा विजांचा कडकडाट आणि वादळी वा-यांसह अवकाळी पाऊस झाला. यातच वीज कोसळून एका किशोरवयीन मुलाचा मृत्यू झाला.

हेही वाचा >>> सांगलीत वादळी पावसाचा तडाखा, वीज कोसळून एकजण ठार तर दोनजण जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जयदीप बापू पवार (वय १७) असे मृताचे नाव आहे. रायगाव शिवारात दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी रायगावला भेट देऊन दुर्घटनाग्रस्त परिस्थितीची पाहणी केली. मृत जयदीप याने अकरावी उत्तीर्ण होऊन बारावी वर्गात गेला होता. गेल्या तीन-चार दिवसांपून करमाळा तालुक्यात वादळी वारे, वावटळीसह अवकाळी पाऊस होत आहे. यात तेथील केळी व अन्य फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एकीकडे तीव्र उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत आहे. पाण्याअभावी केळीच्या बागा सुकत आहेत. या बागा जगविण्यासाठी शेतकरी खासगी टँकर मागवून केळीच्या बागा कशबशा जगविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. परंतु दुसरीकडे वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे केळीच्या बागांवर पुन्हा संकट कोसळले आहे. यात रायगाव शिवारात वीज कोसळून जयदीप पवार या किशोरवयीन मुलाचा मृत्यू झाल्यामुळे करमाळा भागातील संकटाची मालिका सुरूच असल्याचे दिसून येते.