सत्तेच्या बाजारात कोणीही कायमचा शत्रू आणि मित्र नसतो, हे जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकांमधून आला. सत्ता मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी आघाडीमध्ये बिघाडी, तर युतीमध्ये फूट पडून शिवसेनेने काँग्रेसला तर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला ‘साथ’ दिली. राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपनेच बाजी मारली आहे. सत्तास्थापनेत भाजप बाजीगर ठरला असून, दहा जिल्हा परिषदांवर कमळ फुलले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने ६ जिल्हा परिषदा आपल्या ताब्यात ठेवून दुसरा क्रमांक पटकावला आहे.
२५ पैकी दहा जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदी भाजपचे उमेदवार विराजमान झाले आहेत. तर सहा जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादीने अध्यक्षपदाची खुर्ची मिळवली आहे. पाच जिल्हा परिषदा काँग्रेसने ताब्यात ठेवल्या आहेत. शिवसेनेला चार ठिकाणी सत्ता मिळवण्यात यश आले आहे. तेथे शिवसेनेचा उमेदवार अध्यक्षपदी निवडून आला आहे. अनेक ठिकाणी काँग्रेसने शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे. तर भाजपनेही राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्याचे स्पष्ट झाले आहे. बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक लक्षवेधी ठरली. पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना जबरदस्त धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अधिक असूनही बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. तर नाशिक जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात शिवसेनेला यश मिळाले आहे. शिवसेना-काँग्रेस-माकप अशी आघाडी झाली. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात शिवसेनेला यश आले. तर सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ असूनही भाजप पुरस्कृत आघाडीने बाजी मारली. त्यामुळे धैर्यशील मोहिते – पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सहापैकी तीन जिल्हा परिषदांवर भाजपने झेंडा रोवला आहे. अहमदनगरमध्ये काँग्रेस तर पुणे आणि साताऱ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार अध्यक्षपदी विराजमान झाला. नाशिकमध्ये शिवसेना तर जळगावात भाजपचा उमेदवार अध्यक्षपदी निवडून आला. रायगडमध्ये शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली. आदिती तटकरे या अध्यक्षपदी निवडून आल्या. कोकणात भाजपचा एकही अध्यक्ष निवडून आला नाही. सिंधुदुर्गात काँग्रेस, रत्नागिरीमध्ये शिवसेना, तर रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचा उमेदवार विराजमान झाला. औरंगाबाद, जालना, हिंगोलीत शिवसेना, परभणी, उस्मानाबादेत राष्ट्रवादी तर नांदेडमध्ये काँग्रेस, तसेच विदर्भात गडचिरोली, बुलडाणा, चंद्रपुरात भाजपचा अध्यक्ष, तर अमरावती, यवतमाळमध्ये काँग्रेसने विजय मिळवला.
UPDATES:
पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदी विश्वास उर्फ नाना देवकाते उपाध्यक्षपदी विवेक वळसे- पाटील यांची निवड निश्चित
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून रेश्मा सावंत, तर उपाध्यक्षपदासाठी रणजित देसाई यांना उमेदवारी
सांगलीत जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपकडून संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे सुहास बाबर यांचा उमेदवारी अर्ज दाखल, काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी सत्यजित देशमुख, उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे चंद्रकांत पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल
सोलापूर जिल्हा परिषदेत अध्यक्षपदासाठी भाजप-महाआघाडीकडून संजय शिंदे यांचा अर्ज
नाशिक: अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतर्फे मंदाकिनी बनकर आणि जयश्री पवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल
शिवसेनेतर्फे अध्यक्षपदासाठी सविता पवार, शीतल सांगले, सुरेखा दराडे यांचे उमेदवारी अर्ज दाखल
भाजपतर्फे उपाध्यक्षपदासाठी डॉ. आत्माराम कुंभार्डे, समाधान हिरे, लता बछाव यांचे उमेदवारी अर्ज दाखल
नाशिक जिल्हा परिषद: जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु, शिवसेना-काँग्रेस-माकपची युती, राष्ट्रवादी, भाजपचे सदस्य आणि एका अपक्ष सदस्याची सभागृहात उपस्थिती
नाशिक जिल्हा परिषद: अध्यक्षपदाच्या शिवसेनेच्या उमेदवार शीतल सांगळे यांना ३७ मते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार मंदाकिनी बनकर यांना ३५ मते
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, माकप, आघाडीतील शिवसेनेच्या उमेदवार विजयी. तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या नयना गावित विजयी.
नाशिक जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा, पालकमंत्री गिरीश महाजन यांना धक्का
परभणी जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उज्वला राठोड, तर उपाध्यक्षपदी भावना नखाते यांची बिनविरोध निवड
लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपचे मिलिंद लातुरे, उपाध्यक्षपदी रामचंद्र तिरुके यांची निवड
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या शालिनी विखे-पाटील तर उपाध्यक्षपदी राजश्री घुले यांची निवड
सांगली जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच भाजपची सत्ता, अध्यक्षपदी संग्रामसिंह देशमुख यांची निवड
गडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्षपदी योगिता भांडेकर, उपाध्यक्षपदी आदिवासी विद्यार्थी संघटनेचे अजय कंकदलवार यांची निवड
उस्मानाबाद जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता, अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नेताजी पाटील, तर उपाध्यक्षपदी अर्चना पाटील, भाजपही सत्तेत सहभागी होणार
यवतमाळ जिल्हा परिषदेत काँग्रेस-भाजपची युती, अध्यक्षपदी काँग्रेसच्या माधुरी आडे, उपाध्यक्षपदी भाजपचे श्याम जैस्वाल
जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या उज्वला पाटील, तर उपाध्यक्षपदी नंदकुमार महाजन