भाजपमध्ये जेव्हा वाईट परिस्थिती असते, तेव्हा चांगल्या कार्यकर्त्यांना संधी मिळते, तर चांगली परिस्थिती येते तेव्हा चांगल्या कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. सद्य:स्थितीत आपण पक्षात राजकीयदृष्टय़ा ‘गरिबी’चे दिवस काढत आहोत, अशी खंत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी खासदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली. अर्थात या गरिबीशी मुंडे-गडकरी वादाचा संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला. आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षादेशाची वाट न पाहता आपण पक्षाने देईल ती जबाबदारी सांभाळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रविवारी सायंकाळी सोलापूर पत्रकार संघात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात देशमुख यांनी आपली ही व्यथा प्रथमच मांडली. १९९७ साली विधानपरिषदेवर तर २००४ साली सोलापूर लोकसभा निवडणुकीत निवडून गेलेले सुभाष देशमुख, यांनी भाजप-सेना युतीच्या जागा वाटपात सोलापूर जिल्ह्य़ात भाजपकडे सोलापूर शहर उत्तर, अक्कलकोट व माळशिरस अशा अवघ्या तीनच जागा असल्यामुळे याठिकाणी पक्षाच्या वाढीला पोषक वातावरण दिसत नसल्याचेही नमूद केले. लोकमंगल उद्योग समूहाच्या माध्यमातून देशमुख यांनी सोलापूर शहर व जिल्ह्य़ात आसपासच्या परिसरात जाळे विणले आहे. याच ‘लोकमंगल’च्या माध्यमातून देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख यांनी शेजारच्या उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीची पर्वा न करता ‘परिवर्तन यात्रा’ काढून अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची तयारी सज्ज ठेवली आहे. त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर देशमुख यांनी, महायुतीकडूनच रोहन याने उस्मानाबादेतून निवडणूक लढवावी, असा सल्ला दिल्याचे नमूद करीत या निवडणुकीत अखेरच्या क्षणापर्यंत आपण आशावादी असल्याचे सांगितले.
मागील लोकसभा निवडणुकीत माढय़ातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात भाजपने आपणास लढण्याचा आदेश दिला असता तो आपण पाळला आणि पवार यांच्या विरोधात निकराची झुंज दिली. यात आपला बळी गेला, आतादेखील आपला ‘बळी’ जात असल्याचे देशमुख यांनी सांगितले. प्रत्येकवेळी बळी जात असूनही सध्याच्या राजकीय गरिबीची परिस्थिती बदलून आपण राजकीयदृष्टय़ा ‘श्रीमंत’ होणार असल्याचा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर सचिव राकेश कदम यांनी आभार मानले. या वेळी भाजपचे अविनाश महागावकर हे उपस्थित होते.