सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाचशे, हजार मूल्यांच्या नोटा रद्द होताच विधानपरिषद निवडणुकीतील मतांचा घोडेबाजारही बुधवारी कोसळला. प्रत्येक सदस्याला दिल्या गेलेल्या या लाखो रुपयांच्या आश्वासनासाठी आता ही ‘गोळाबेरीज’ कशी करायची याच्याच चिंतेत हे उमेदवार  असल्याचे  दबक्या आवाजात सर्वत्र ऐकायला मिळत होते.

सध्या विधानपरिषदेसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेसचे मोहनराव कदम आणि राष्ट्रवादीचे शेखर गोरे यांच्यात लढत होत आहे. या निवडणुकीत ‘तुल्यबळ’ उमेदवारांमुळे घोडेबाजार होणार याचा दोन्ही पक्षाकडून गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तर यंदा हेलिकॉप्टरमधून पैसे वाटले जाणार असे जाहीर वक्तव्य करत याची मोठी चर्चा घडवून आणली आहे.

या निवडणुकीसाठी दोन्ही जिल्’ाांतील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक असे ५७० मतदार आहेत. यापकी २८४ महिला मतदार आहेत. मतदार निश्चित असल्याने ही निवडणूक जाहीर होताच दोन्ही उमेदवारांकडून या मतदारांची निश्चिती घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या गटांकडून या मतदारांची ‘बांधणी’ही सुरू आहे. प्रत्येकाची भेट, मग आश्वासने आणि आतातर आपापल्या मतदारांना सहलीच्या निमित्ताने सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणे या गोष्टी घडल्या आहेत. या निवडणुकीत प्रत्येक मतांमागे १० लाखांपर्यंत बोली लावल्याची चर्चा आहे. मतदारांची ही सारी बांधणी सुरू असतानाच काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातील पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाच रद्द केल्याने हा निवडणूक बाजार एकदम कोसळला. या निर्णयामुळे देवघेवीसाठी वापरली जाणारी रक्कमच आता धोक्यात आल्याने उमेदवार आणि मतदार दोन्हीही बाजूंना गोंधळ उडाला आहे. याला पर्याय म्हणून काहींकडून आता सोन्याचा पर्याय सुचवला जातोय. पण त्यालाही अनेक मर्यादा असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगितले जाते आहे. मतदानासाठी राहिलेला कमी वेळ, त्यातच या नव्या निर्णयामुळे झालेले बदल यामुळे या प्रचारात सध्या हे नवेच उपनाटय़ रंगल्याचे ऐकायला मिळत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local body elections in satara and sangli
First published on: 10-11-2016 at 01:27 IST