कराड : आमदार व भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिणमधून निवडून येताच विकासकामांचा धडका लावला असून, लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते परिश्रम घेत आहेत. पुणे- बंगळूरू महामार्गावर कराड व मलकापूर शहरात सुमारे पावणेचार किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारताना, मलकापूर शहरातील शास्त्रीनगर विभागातील महामार्गाच्या पूर्व व पश्चिम विभागासाठी खांब क्रमांक ७५ ते ७६ दरम्यान, कायमस्वरुपी रस्ता क्रॉसिंग आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांची मोठी सोय झाली आहे.
या मागणीसाठी तानाजी देशमुख यांनी केलेल्या पाठपुराव्याला आमदार डॉ. अतुल भोसले यांनी पाठबळ दिल्याने या क्रॉसिंगला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, आमदार डॉ. अतुल भोसले यांचा शास्त्रीनगर विभागातर्फे भव्य सत्कार करण्यात आला. या वेळी मलकापूर नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते हणमंत जाधव, सूरज शेवाळे, विजय देशमुख, तानाजी देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार डॉ. अतुल भोसले म्हणाले, की शास्त्रीनगर विभागातील नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या उड्डाणपुलाखालील क्रॉसिंगच्या मागणीची दखल घेत त्याला मंजुरी मिळवून दिली आहे. याबाबत माझे निकटवर्तीय व सामाजिक कार्यकर्ते तानाजी देशमुखांच्या नेतृत्वाखाली ७ फेब्रुवारी २०२५ रोजी मला येथील स्थानिक नागरिकांतर्फे निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रस्ते विकास महामंडळाशी समन्वय साधून या विभागाच्या रास्त मागणीचा विचार करुन या ठिकाणी कायमस्वरुपी मार्ग (क्रॉसिंग) सुविधा उपलब्ध करुन द्याव्या, अशी मागणी त्यांची आग्रही मागणी होती. ती पूर्ण झाली असून, नागरिकांच्या योग्य मागणीचा विचार करून समस्या सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार डॉ. अतुल भोसले यांनी या वेळी दिली.
(लोकांची मोठी सोय होणार)
महामार्ग प्राधिकरणाने लोकांच्या मागणीनुसार उड्डाणपूल खांब क्रमांक ७५ ते ७६ दरम्यान, क्रॉसिंगला मंजुरी दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे उड्डाणपुलाचे व त्याखालील आठपदरी रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर मंजुरी मिळालेल्या क्रॉसिंगमधून लोकांची ये जा होणार आहे. लोकांची ही फार मोठी सोय झाली आहे. त्यामुळे शास्त्रीनगर परिसरातील लोक आमदार डॉ. अतुल भोसले आणि तानाजी देशमुख यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत आहे. या बद्दल स्थानिकांनी एकत्र येत आमदार डॉ. अतुल भोसले यांचा सत्कार घेतला आणि हा कौतुक सोहळा चांगलाच रंगला होता. त्यात स्थानिक लोकांनी आमदार डॉ. अतुल भोसले यांचा या वेळी गुणगौरवही केला आहे.