काँग्रेसचे डॉ. सुजय विखे-पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रवेश करण्याची ही आपली वैयक्तिक भूमिका असून आई-वडिलांच्या इच्छेविरोधात मला हा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. मी भाजपाच्या नेतृत्वाखाली कुटुंबाला गर्व वाटेन अशी कामगिरी करेन, असे त्यांनी यावेळी म्हटले.

मी, माझे कार्यकर्ते नगर जिल्ह्यात भाजपाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत संकटकाळी ज्यांनी मला साथ दिली मी त्यांच्याबरोबर असेन, असा विश्वास दिला. यावेळी त्यांनी भाजपाचा विजय असो अशी घोषणा दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या आमदारांनी दिलेला पाठिंबा आणि मदतीमुळे मलाहा निर्णय घेता आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राम शिंदे, शिवाजी कर्डिले, बबनराव पाचपुते आदींसह नगर जिल्ह्यातील भाजपाचे आमदार, नेते उपस्थित होते.

दरम्यान, सुजय यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील हे विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देतील असेही बोलले जात आहे.