नाशिक लोकसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमधील घोळाविषयी राज्य निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करण्याचा निर्णय मनसेने घेतला असून ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत, त्यांनी पक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आ. वसंत गीते यांनी रविवारी केले.
मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघातील विभाग उपाध्यक्ष, गट अध्यक्षांच्या मेळाव्यात ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत हजारो मतदारांना यादीतील घोळामुळे इच्छा असूनही मतदानाचा हक्क बजावता आला नाही. काही भागात सत्ताधाऱ्यांनी ठरावीक समाजातील मतदारांची नावे वगळल्याचे आरोप झाले. परदेशातून फक्त मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्यांनाही यादीत नाव नसल्याने मतदान करता आले नसल्याचे गीते यांनी लक्षात आणून दिले. मनसेने सर्वप्रथम मतदार यादीत नावनोंदणीसाठी मतदार जागृती अभियान राबविले. त्यामुळे हजारो नवमतदारांना लोकशाहीच्या या प्रक्रियेत सहभागी होता आले. परंतु मतदार यादीतील घोळामुळे यापूर्वी मतदान केलेल्या हजारो मतदारांना यावेळी मतदान करता आले नसल्याचे त्यांनी सांगितले. पक्षातर्फे पुन्हा एकदा मोठय़ा प्रमाणावर मतदार जागृती अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगून ज्यांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत, अशा मतदारांनी त्यांच्या प्रभागातील मनसे पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या मतदार नोंदीबाबत माहिती व पुरावे सादर करावेत असे आवाहनही गीते यांनी केले.