निवडणुकीतील पूर्ववैमनस्य, पाच दिवस कोठडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाटोदा तालुक्यातील (बीड) नाळवंडी ग्रामपंचायतीच्या निवडणूक वादातून विरोधी पॅनेलच्या प्रमुखावर जामखेडमध्ये गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. दोघांनाही न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. शिवाजी केशव काकडे (२९, रा. नाळवंडी) व भरत पांडुरंग जगदाळे (२९, रा. जामखेड) अशी दोघांची नावे आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी ही माहिती दिली. या वेळी प्रशिक्षणार्थी सहायक अधीक्षक निलभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार व जामखेडचे सहायक निरीक्षक एन. बी. पगार उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी जामखेडमध्ये ही घटना घडली होती. यातील तीन ते चार आरोपी अद्यापि फरार आहेत व त्यांची ओळख पटलेली नाही. गोळीबारात जामखेडमधील डॉ. साजिद जानमहमद पठाण व औषध विक्रेते दुकानदार कय्युम सुलेमान शेख हे दोघे जखमी झाले आहेत.

नालवंडीच्या ग्रामपंचायतीत जानमहमद पठाण यांचे गेल्या २५ वर्षांपासूनचे प्रस्थापित नेतृत्व आहे. त्यांचा मुलगा डॉ. साजिद जामखेडमध्ये प्रॅक्टिस करतो. अडीच महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पठाण यांच्या गटाचे सरपंच व चार सदस्य निवडून आले तर विरोधी काकडे गटाचे ५ सदस्य विजयी झाले.

८ जानेवारीला उपसरपंच पदाची निवडणूक होती. त्यात दोन्ही गटांची समान मते निर्माण झाल्याने सरपंचाचे मत निर्णायक झाले परंतु काकडे यांच्या हरकतीमुळे विजयी उपसरपंचाची निवड घोषित झाली नाही. त्यातून दोन्ही गटांत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. परस्परविरोधी उपोषणे, तक्रारी, गुन्हेही दाखल करण्यात आलेले आहेत. हे वाद पाटोदा पोलिस व तहसीलदारांनी मिटवले होते. परंतु त्यानंतरही पुन्हा परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले.

उपसरपंच पदाचा वाद पाटोदा न्यायालयात सुरू आहे, त्याच्या सुनावणीसाठी जात असताना जानमहमद यांच्यावर १ फेब्रुवारीच्या सकाळी काकडे व इतरांनी हल्ला केला, त्यात जानमहमद गंभीर जखमी झाले. ही घटना त्यांचा मुलगा डॉ. साजिद याला समजताच ते कय्युम यांच्यासमवेत तिकडे जाण्यास निघाले, रस्त्यातच जामखेडमध्ये त्यांच्यावर काकडे व इतरांनी गोळ्या झाडल्या होत्या. काकडे व जगदाळे या दोघांना सहायक निरीक्षक पगार, उपनिरीक्षक नामदेव सहारे, हवालदार बडे, गाडे, जाधव, साने, सपट यांच्या पथकाने पकडले.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta crime news
First published on: 04-02-2018 at 02:36 IST