माझ्या आई वडिलांनी मला कधीच राजकारणासंदर्भातील सल्ला दिलेला नाही असं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. मला कधीच एखादी गोष्ट कर किंवा करु नको असा सल्ला आई-बाबांकडून देण्यात आला नाही, असं सुप्रिया यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा भविष्यवेध घेण्याच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’कडून आयोजित ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूर-संवादमालिकेत बोलताना सांगितलं.

राजकारण तुझा प्रांत नाही किंवा तू राजकारणाच्या फंद्यात पडू नकोस असा सल्ला तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी दिला होता का असा प्रश्न या मुलाखतीच्या सुरुवातीलाच ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी सुप्रिया यांना विचारला. यावर उत्तर देताना माझ्यावर कधीच माझ्या आई वडिलांनी कोणत्याही निर्णयासंदर्भात दबाव टाकला नाही किंवा प्रोत्साहनही दिलं नाही असं सुप्रिया यांनी सांगितलं.

माझ्या आई-वडीलांना मी अनेकदा हा प्रश्न विचारते की तुम्ही मला कधीच कशासाठी प्रोत्साहन का दिलं नाही? मी स्वत:ला प्रोत्साहन देत असते. म्हणजे एखाद्या वेळेस संसदेत पाच सहा भाषण दिली तर पुढच्या वेळेत सहा सात देण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यासाठी मी स्वत:ला प्रोत्साहन देत असते. दुसरीकडे मी एखाद्या भाषणाची तयारी वगैरे करत असतानाच बाबा अचानक एखाद्या अॅक्टीव्हीटीसाठी सांगतात आणि म्हणतात की चला चला काहीतरी करुयात. त्यावेळी मी नकार देत मला भाषणांसंदर्भात काम असल्याचं सांगते. मात्र त्यावरही बाबा नंतर काहीच बोलत नाहीत, असं सुप्रिया यांनी सांगितलं.

लहानपणापासूनच मला मार्क जास्त पडले पाहिजेत, हे शिक ते शिक असं कधीच झालं नाही. हे करा किंवा करु नको असं मला आई-बाबा कधीच म्हटले नाहीत. बघ हे केलं तर असं होईल किंवा असंही होऊ शकतं, अशापद्धतीने त्यांनी मार्गदर्शन मात्र नक्की केला. एखादा निर्णय तू असा घ्यावा असं ते मला कधी सांगत नाही. म्हणजे मी या इलेक्शनमध्ये वेगळं अजून काय करावं असा प्रश्न विचारल्यावर बाबा मला ठाऊक नाही अशापद्धतीचं उत्तर देतात, असं सुप्रिया यांनी सांगितलं. माझ्या आईला राजकारण आवडत नाही. मात्र मला राजकारण आवडत नाही पण तू जायचं की नाही हे तू ठरवं अशी तिची भूमिका होती, असंही सुप्रिया यांनी आईच्या भूमिकेबद्दल बोलताना सांगितलं.

प्रायोजक
* प्रस्तुती : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
* सहप्रायोजक : एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), कपॅसिटे इन्फ्रा प्रोजेक्ट्स लि.