२२ जून रोजी ‘लोकसत्ता एसएमई कॉन्क्लेव्ह’; उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

तीन दशकांपासून वसई-विरार शहराच्या विविध भागात लघु उद्योगांची उभारणी झाली. अनेक नवनवीन कंपन्या वसईत स्थिरावल्या. मात्र आजही या अनेक कंपन्यांना समस्या भेडसावत आहेत. या समस्यांवर चर्चा घडवून आणतानाच त्यावर उपायांचा शोध घेण्यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे येत्या २२ जून रोजी वसईत ‘लघु आणि मध्यम उद्योग परिषदेचे’ (एसएमई कॉन्क्लेव्ह) आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत चर्चिल्या जाणाऱ्या मुद्दय़ांतून लघुउद्योगांना प्रगतीचे कोंदण देण्यावर  भर दिला जाणार आहे.

वसईतील विविध उद्योजकांच्या संघटना शासनदरबारी पाठपुरावा करीत असतात.  ‘सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.’ प्रस्तुत ‘लोकसत्ता एसएमई कॉन्क्लेव्ह’ २२ जून रोजी बाभोळा येथील सनराइज हॉल येथे होणार असून राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई हे या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे हेही या कार्यक्रमात उपस्थित राहणार असून ‘जिल्हानिर्मिती आणि उद्योगांच्या पायाभूत सुविधा’ या विषयावर ते माहिती देणार आहेत. त्याचप्रमाणे मुंबई शेअर बाजारातील लघु व मध्यम उद्योग विभागाचे प्रमुख अजय ठाकूर हे ‘भांडवली बाजार आणि लघु व मध्यम उद्योग’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

लघु आणि मध्यम उद्योगांची प्रगती ही देशाच्या आणि राज्याच्या सर्वागीण विकासाशी थेट निगडित असते. रोजगाराच्या संधी या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात निर्माण होत असतात. त्यामुळे ‘लोकसत्ता एसएमई कॉनक्लेव्ह’च्या माध्यमातून सर्व घटकांना एकाच व्यासपीठावर आणून संधी, समस्या आणि उपायांवर विचारमंथन केले जाणार आहे. या परिषदेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नसले तरी, प्रवेश फक्त निमंत्रितांसाठी आहे.

गेल्या तीन दशकांपासून या पट्टय़ात मोठय़ा प्रमाणात उद्योग, लघू उद्योग उभे राहिले आहेत. मात्र, आजही येथील लघुउद्योगांना अनेक समस्या भेडसावत आहेत.

काय?

लोकसत्ता ‘एसएमई कॉन्क्लेव्ह’ २०१९

कधी?

शनिवार, २२ जून सकाळी १०.३० पासून.

कुठे?

सनराइज हॉल, होमेज भवन, दुसरा मजला, रिचमंड टाऊन २, बाभोळा, वसई (पश्चिम)

प्रायोजक

‘लोकसत्ता एसएमई कॉन्क्लेव्ह’चे टायटल पार्टनर सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड हे असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे पॉवर्ड बाय पार्टनर आहेत.