भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवून राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपच्या नेतृत्त्वाखालील युती सरकारच्या भ्रष्टाचारावरच चर्चा व्हावी, हे दुर्दैवी असल्याची घणाघाती टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी केली. राज्यात डाळींच्या साठेबाजीमुळे चार ते साडेचार हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.
विधान परिषदेत या विषयावर झालेल्या चर्चेमध्ये सहभागी होताना मुंडे म्हणाले, डाळींच्या साठेबाजीवर असलेले निर्बंध उठवण्याची कोणतीही मागणी किंवा प्रस्ताव नसताना हे निर्बंध का उठवले गेले. साठेबाजांवर कारवाई करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्याला दिले होते. पण कोणत्याही साठेबाजावर कारवाई करण्यात आली नाही. डाळींच्या महागाईत सामान्य होरपळले तरी चालेल, पण साठेबाजांचा फायदा झाला पाहिजे, हा सरकारचा उद्देश स्पष्ट होतो, असाही आरोप त्यांनी केला.
काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांनीही विविध घोटाळ्यांच्या आरोपांवरून गिरीश बापट, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. डाळीच्या साठेबाजीत चार हजार कोटींचा घोटाळा झाला असून, महिला व बालकल्याण विभागात १६६ कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप रणपिसे यांनी केला. त्याचबरोबर जेएसडब्लू इस्पात कंपनीतील ५७२ कोटींच्या घोटाळ्यावरून त्यांनी बावनकुळे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.