अयोध्येतील राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राणप्रतिष्ठा करताना आलेला अनुभव अलौकिक होता असं सांगितलं. तर त्याच दिवशी म्हणजेच २२ जानेवारीच्या दिवशी उद्धव ठाकरे हे नाशिकच्या काळा राम मंदिरात गेले होते. तिथे त्यांनी आरतीही केली. राम या नावाचा महिमा खूप मोठा आहे. राम कृष्ण हरी म्हणणं ही वारकऱ्यांचीही परंपरा आहे. रामायण, राम या विषयांवर आत्तापर्यंत विपुल लेखन करण्यात आलं आहे. अशात प्राध्यापक आणि इतिहासकार सदानंद मोरे यांनी राम हा अयोध्येच्या आधी महाराष्ट्राचा राजा आहे असा दावा केला आहे. तसंच राम संतपरंपरेमुळे कसा आपल्या पूजेमध्ये टिकून राहिला हेदेखील स्पष्ट केलं आहे. ‘थिंक बँक’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रभू रामाची आणि कृष्णाची एक वेगळी ओळखही विशद केली आहे.

सदानंद मोरेंनी काय म्हटलं आहे?

“महाराष्ट्रात एक वारकरी संप्रदाय आहे जो ज्ञानोबा-तुकोबांचा आहे. दुसरा संप्रदाय हा रामदासी संप्रदाय आहे. वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात खूप वर्षांपासून अस्तित्वात आहे. त्या संप्रदायाला राम कधीही वर्ज्य नव्हता. राम कृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य मंत्र आहे. वारकरी संप्रदायात नव्या माणसाला प्रविष्ट केलं जातं तेव्हा त्याला देण्यात येणारा मंत्र आहे तो म्हणजे राम कृष्ण हरी. तुकाराम महाराजांनाही त्यांच्या गुरुंनी राम कृष्ण हरी हाच मंत्र दिला. या मंत्रात राम आणि कृष्ण आहेत. असं असताना समर्थ रामदासांनी वेगळा संप्रदाय केला. समर्थांच्या आधी ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज हे सगळे होते. रामाबाबत पहिलं भाष्य ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आहे.” असं सदानंद मोरेंनी सांगितलं.

Dr Amol Kolhe on Ajit Pawar karyasamrat
‘माझे काका अभिनय क्षेत्रात नव्हते’, नटसम्राट या टीकेवर अमोल कोल्हेंची अजित पवारांवर खोचक टीका
kolhapur lok sabha seat, sanjay mandlik, sanjay mandlik controversial statement, shahu maharaj, historians criticise sanjay mandlik, shivsena, bjp, congress, lok sabha 2024, election 2024, mahayuti, maha vikas aghadi, kolhapur politics, kolhapur shahu maharaj, controversial statment on shahu maharaj,
छत्रपतींच्या गादीचा मंडलिकांकडून अवमान; इतिहास संशोधकांनी व्यक्त केला निषेध
shashikant shinde
निष्ठा बदलली नाही म्हणून होणाऱ्या परिणामांना भीत नाही; शशिकांत शिंदे यांचा कणखर बाणा
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

ज्ञानेश्वर महाराज रामाविषयी काय म्हणाले?

“ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर भाष्य लिहिलं ज्या ग्रंथाचं नाव आहे ज्ञानेश्वरी. त्या ज्ञानेश्वरीतल्या दहाव्या अध्यायात ‘विभुती योग’ सांगितला आहे. श्रीकृष्णाने म्हणजेच भगवंताने आपल्या विभुती कोण आहेत? माणूस, प्राणी, वृक्ष कोण आहे? हे सगळं सांगितलं आहे. ‘राम हा शस्त्र भुता अहंम’ असा उल्लेख आहे. शस्त्रधारी किंवा कोदंडधारी राम का? कारण रामाच्या धनुष्याचं नाव कोदंड आहे. कृष्णाने हे सांगितलं पण ज्ञानेश्वर म्हणतात, ‘शस्त्रधरां समस्ता माझी श्रीराम तो मी. जेणे साकडलिया धर्माचे कैवारे आपणपया धनुष्य करुनी दुसरे, विजयलक्ष्मी एक मोहरे केले त्रेती.’ ज्ञानेश्वर याचा अर्थ काय सांगतात की धर्माला ग्लानी आली होती म्हणून मी स्वतःलाच धनुष्य केलं. रामच धनुष्य झाले असं ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे. पुढे ज्ञानेश्वर म्हणतात, ‘पाठी उभे ठाकुनी सुवेळी, प्रताप लंकेश्वराची शिसाळी गगनी उदो म्हणतया हस्ता दिधली भुता.’ जणू काही रावणाचं एक एक मस्तक तोडून भुताखेतांना, दुष्ट शक्तींना बळी दिलं. धर्माचा जिर्णोद्धार केला असंही ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे. ‘संभवामी युगे युगे’ याचाच हा वेगळा अर्थ इथे सापडतो. ज्ञानेश्वर हे देखील म्हणतात की राम म्हणजे सूर्यवंशात उगवलेला सूर्यच आहे. महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांनी रामाविषयी केलेलं हे पहिलं प्रतिपादन आहे जे वारकरी संप्रदायाकडून आलं आहे.”

Ram Idol Ayodhya Temple
रामाच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या आधी विधीवत पूजा करण्यात आली.

नामदेव महाराजांनी रामाविषयी काय म्हटलं आहे?

“संत नामदेव हे महाराष्ट्रातले आद्य कथाकार आहेत. त्यांनी अभंगांतून रामाची कथाच सांगितली आहे. वारकरी संप्रदायात रामनवमीच्या दिवशी किर्तन होतं. जिथे वारकरी आहेत, मंदिरं आहेत तिथे रामनवमीच्या दिवशी किर्तन होतंच. नामदेवांच्या अभंगांवरुन रामाचं चरित्र सांगितलं जातं. राम कृष्ण हरी केशवा मंत्र हा जपावा सर्वकाळ हा हरिपाठातला मंत्र आहे.” असंही सदानंद मोरेंनी म्हटलं आहे.

तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्ये रामासंबंधीचे १४ अभंग

“तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्ये रामासंबंधीचे १४ अभंग आहेत. तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटलं आहे की ‘तारी ऐसे जड उदकावरी जो जड’ म्हणजेच वानरांनी दगडांवर रामाचं नाव लिहिलं आणि ते तरले. ‘तो हा न करी काही, का रे लीन न व्हा पायी’ याचा अर्थ जो काहीही करु शकतो त्याच्या पायी तुम्ही लीन का होत नाही? असं तुकाराम महाराज म्हणतात. पुढे तुकाराम म्हणतात, ‘शिळा मनुष्य झाली ज्याचे चरणाचे चाली’ ‘वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका’ शिळा मनुष्य झाली हा अहिल्येचा उल्लेख तुकारामांनी केलाय. तसंच दुसऱ्या ओळीचा अर्थ आहे की वानरांच्या मदतीने रामाने लंकेवर कसा विजय मिळवला असे अभंग तुकारामांनी लिहिले आहेत. एका अभंगात तुकाराम राम अयोध्येला परतल्याचं वर्णन करताना म्हणतात, ‘झाले रामराज्य, आनंदली सकळे’. इथे रामराज्य शब्द पहिल्यांदा आला. तसंच पुढे तुकाराम महाराज म्हणतात, ‘झाले रामराज्य, काय उणे आम्हासी.’ रामराज्याची कल्पना ही समृद्धीची कल्पना आहे. रामराज्यात कशाचीही कमतरता नाही असं तुकाराम म्हणत आहेत.”

Ram Idol Ayodhya Temple
राम मंदिरात सध्या खूप गर्दी होते आहे. रामाच्या मंदिराची प्रतीक्षा मोठ्या संघर्षानंतर संपली आहे.

राम आणि कृष्ण या संकल्पना काय?

“वारकरी संप्रदायात ‘काला’ वगैरे केला जातो, ‘राम कृष्ण हरी’चा गजर होतो. तरीही कृष्णाचं महत्व अधिक आहे असं भासतं. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की कृष्णाने काही एक गोष्ट सांगितली आहे. कृष्णाच्या नावाने एक तात्विक ग्रंथ आहे ज्याचं नाव भगवद्गीता आहे. तसं रामाच्या नावाने काही नाही. रामाला वशिष्ठांनी सांगितलं त्याला ‘योग वशिष्ठ’ म्हटलं गेलं. राम कुणाला उपदेश करतोय असं कुठेही आढळत नाही. तसंच रामाला आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो. त्याचा एक अर्थ असा आहे की धर्माची आणि नीतीची जी मर्यादा आहे त्या मर्यादेतच कसं राहायचं? हे राम बघतो. रामावर काही आक्षेपही घेतले जातात, त्याने सीतेचा त्याग केल्याचीही टीका होते. आक्षेप घेणाऱ्यांची भूमिका आपण समजू शकतो. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की धर्म नावाची चौकट रामाने स्वीकारली आहे. त्या मर्यादेत जो योग्य आहे ते राम करणार. असंही म्हटलं जातं की वाल्मिकींनी रामाचा जन्म होण्याआधीच रामायण लिहून ठेवलं होतं. ‘कोळियाची किर्ती गायली गहन, केले रामायण रामाआधी’ असा तुकारामांचा अभंग आहे. याचाच अर्थ वाल्मिकींनी जे लिहिलं त्याच्या बाहेर जाण्याचा अधिकार रामाला नाही. ”

हे पण वाचा- राम मंदिर उद्घाटन वाद: हिंदू धर्म टिकवण्यासाठी शंकराचार्यांचे योगदान काय?, सदानंद मोरेंचा परखड सवाल

यापुढे सदानंद मोरे म्हणतात, “समाज जर चालायचा असेल तर एक मर्यादा ही असावीच लागते. त्या मर्यादेत जास्तीत जास्त कसं राहता येईल? याचं उदाहरण म्हणजे राम. पण अशा मर्यादेत तुम्ही कायम राहू शकाल का? समाजासाठी, स्थैर्यासाठी या गोष्टी असतात. पण मर्यादांना कुणी चिकटून बसलं आणि देशःकाल परिस्थितीचा विचार केला नाही तर ज्या धर्मामुळे आत्तापर्यंत संरक्षण झालं ते होणार नाही. म्हणून प्रसंगी तुम्हाला मर्यादा ओलांडाव्या लागतात. प्रसंगी हे महत्त्वाचं आहे. तो प्रसंग कुठला? नियमला अपवाद कधी करायचा? फक्त लहर आली म्हणून किंवा स्वार्थ अडकला आहे म्हणून तो करता येत नाही. त्यासाठी तो अधिकार असणाराच तिथे पाहिजे. त्या अधिकाराचा कृष्ण आहे. राम मर्यादेत राहणारा आहे आणि कृष्ण मर्यादा केव्हा ओलांडायची हे सांगणारा आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीत जेव्हा सामान्य परिस्थिती असते तोपर्यंत धर्म, तोपर्यंत राम, तोपर्यंत मर्यादा. पण परिस्थिती जर भलतीकडे जाऊ लागली तर तिथे कृष्ण. आता मुद्दा हा आहे की हा समन्वय कसा साधायाचा? चौकटीबाहेरच गोष्ट करायची म्हटली तर अराजक निर्माण होईल. चौकटीत करायची असेल तर जेव्हा समाजासाठी ती मोडायची वेळ येते तेव्हा ती मोडता येणार नाही त्यात तुमचा नाश होईल. जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी अनेकांची आक्रमणं झाली. त्या आक्रमणांमध्ये ते-ते समाज आणि संस्कृती संपल्या, त्यांचा नाश झाला. भारतीय संस्कृती टिकली कारण इथे राम आणि कृष्ण आहे. एक मर्यादेत कसं वागायचं सांगणारा आहे तर एक मर्यादा कुठे आणि कशी ओलांडायची हे सांगणारा आहे. मर्यादा ओलांडल्यानंतर परिस्थिती पूर्ववत झाली की परत मर्यादा पाळणं आलंच. हे वारकरी संप्रदायाने ओळखलं त्यामुळे आपली संस्कृती टिकली आहे.”

राम हा आधी महाराष्ट्राचा राजा आहे नंतर अयोध्येचा

“राम, लक्ष्मण आणि सीता वनवासात गेले, त्यानंतर सीतेला रावणाने पळवलं. रामाने रावणाचा वध केला, त्याला सुग्रीव, हनुमान, अंगद यांच्यासह सगळ्या वानरसेनेची मदत मिळाली हे सगळं आपल्याला माहीत आहे. रामाचा वनवास सुरु असताना भरताने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून १४ वर्षे राज्य केलं. भरताच्या कानी बातमी आली की सीतेचं हरण केलं आहे रावणाने. राम सैन्यानिशी लंकेवर स्वारी करायला निघाला आहे. मात्र ही बातमी भरतापर्यंत उशिरा पोहचली. त्याला कळलं तेव्हा तो सैन्य घेऊन निघाला. तो कुठे पोहचला? तर दंडकारण्यातील जनस्थान या ठिकाणी म्हणजेच नाशिक पंचवटी या ठिकाणी तो पोहचला. तिथे पोहचल्यावर भरताला समजलं की राम रावणाचं युद्ध झालं, रावण मारला गेला आणि राम आता परत येत आहेत. अयोध्येत राम, लक्ष्मण सीता परतत आहेत हे त्याला कळलं. भरत त्यावेळी जनस्थान म्हणजेच आत्ताचं जे नाशिक आहे तिथपर्यंत पोहचला होता. तर प्रभू राम लंकेवरुन आला. या दोघांची पुन्हा भेट झाली. ही भेट जनस्थान या ठिकाणी झाली. त्यावेळी भरताने रामाला सांगितलं तुझा वनवासाचा काळ संपतोय त्यामुळे आम्ही तुझा राज्याभिषेक इथेच करणार. राज्याभिषेक कुठे झाला? तर जनस्थानात. म्हणजेच आत्ताच्या नाशिकमध्ये झाला. वशिष्ठ, वामदेव हे सगळे ऋषी त्या राज्याभिषेकाला आले होते. विविध नद्यांमधून जल आणलं गेलं, त्यानंतर रामाचा जनस्थानात म्हणजेच नाशिकमध्ये राज्याभिषेक करण्यात आला. अयोध्येतला राज्याभिषेक त्यानंतर झाला. त्यामुळे राम हा अधिकृतपणे महाराष्ट्राचा राजा आहे.”

भासाच्या प्रतिमा नाटकात आहे महत्त्वाचा उल्लेख

राम हा महाराष्ट्राचा राजा आहे हे कुणी सांगितलं आहे? तर ‘भास’ नावाच्या लेखकाने सांगितलं आहे. भासाचा काळ कालिदासाच्या पूर्वीचा आहे. त्याने १३ नाटकं लिहिली. नाटककार आणि कवी असलेल्या भासाने ‘प्रतिमा’ नाटकात हे सगळं लिहून ठेवलं आहे. दंडकारण्य हे इश्वाकूचंच राज्य होतं. दंडकारण्याची व्याप्ती रामेश्वरमपर्यंत होती. त्यावेळी रावणाने त्या राज्यावर कब्जा केला होता. अगस्ती ऋषींनी राम जेव्हा वनवासात असताना या ठिकाणी आला तेव्हाच त्याला म्हटलं होतं की रामा तू इथला राजा हो कारण हे तुझ्या पूर्वजाचं म्हणजेच इश्वाकूचं राज्य आहे. अगस्ती ऋषींचं म्हणणं पूर्ण कुणी केलं तर भरताने. कारण त्याने जनस्थानात रामाचा राज्याभिषेक केला. राम आणि महाराष्ट्राचं नातं महत्त्वाचं आहे कारण राम हा महाराष्ट्राचा राजा आहे. त्यांची एक राजधानी अयोध्या आणि दुसरी नाशिक. ब्रिटिश अधिकारी विल्यम हंटरने नाशिक ही राजधानी व्हावी अशी मागणी केली होती. कारण त्याला नाशिकचं महत्त्व समजलं होतं.” असंही सदानंद मोरेंनी स्पष्ट केलं आहे तसंच राम आणि महाराष्ट्र यांचं नात किती जवळचं आहे ते देखील सांगितलं आहे.