राजकीय क्षेत्रातील सक्रिय पदार्पणाच्या रौप्यमहोत्सवी वर्षांत शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांचे नशीब बलवत्तर ठरले! खोतकर यांना ४५ हजार ७८ व त्यांचे प्रतिस्पर्धी कैलास गोरंटय़ाल (काँग्रेस) यांना मिळालेल्या ४४ हजार ७८२ या मतांवरून या अटीतटीच्या लढतीची कल्पना येऊ शकते.
अरविंद चव्हाण (भाजप) ३७ हजार ५९१ व अब्दुल रशीद (बसप) ३६ हजार ६५० यांना ग्रामीण भागात आणखी थोडी मते मिळाली असती, तरी निकाल खाली-वर होऊ शकला असता, एवढी ही लढत चुरशीने झाली. खोतकर यांनी २५ वर्षांपूर्वी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. १९९०मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. तेव्हापासून जिल्हय़ातील राजकारणात त्यांचे महत्त्व कायम राहिले. ६५ टक्के शहरी व ३५ टक्के ग्रामीण मतदारांचे प्रमाण असलेल्या या मतदारसंघात झालेल्या मतदानाच्या २५.५३ टक्के मते घेणारे खोतकर विजयी झाले. इतर तीन प्रमुख उमेदवारांना काँग्रेस (२५.२७ टक्के), भाजप (२१.१२ टक्के) व बसप (२०.४३ टक्के) मिळालेली मते पाहिल्यास ही लढत किती अटीतटीची झाली हे दिसते. शहरापेक्षा कमी मतदार असलेल्या ग्रामीण भागाने साथ दिल्याने खोतकरांचा विजय सुलभ झाला. खोतकर यांना मिळालेल्या मतांमध्ये जवळपास ५६ टक्के वाटा ग्रामीण भागाचा आहे. गोरंटय़ाल (३२ टक्के), चव्हाण (२६ टक्के) व अब्दुल रशीद (२२ टक्के) याप्रमाणे अन्य उमेदवारांना मिळालेल्या मतांचे प्रमाण आहे.
केवळ २९६ एवढय़ा कमी मताधिक्याने विजयी झालेले खोतकर जालना शहरात मते घेण्यात चौथ्या क्रमांकावर आहेत. शहरी भागात गोरंटय़ाल यांना ३० हजारांपेक्षा अधिक, तर अब्दुल रशीद यांना २८ हजारांपेक्षा अधिक मते आहेत. चव्हाण यांनी २७ हजारांपेक्षा अधिक मते घेतली. टपाली मतदानात खोतकर (३५०) व गोरंटय़ाल (३३१) यांच्यात फारसे अंतर नव्हते. गोरंटय़ाल यांना शहरी भागात खोतकर यांच्यापेक्षा १० हजारांहून अधिक मते मिळाली. परंतु त्यांना त्याचा उपयोग विजयासाठी होऊ शकला नाही. शहरी भागात अब्दुल रशीद यांना २८ हजारांपेक्षा अधिक मतदान झाले, तर चव्हाण यांनाही २७ हजारांपेक्षा अधिक मतदान झाले. शहरी भागातील मतदानाची विभागणी साहजिकच खोतकर यांच्या पथ्यावर पडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शहरात वाहणारे भाजपचे वारे व अब्दुल रशीद यांच्या प्रचारासाठी झालेल्या मायावतींच्या सभेस लोटलेली गर्दी याची दखल शिवसेनेने जेवढी गांभीर्याने घेतली, तेवढी काँग्रेसने घेतली नाही. त्यामुळे काँग्रेसचा हातातोंडाशी आलेला विजयाचा घास तसाच राहून गेला! खोतकर यांनी आतापर्यंत विधानसभेच्या सहा निवडणुका लढविल्या. २००९चा अपवाद वगळता उर्वरित पाचही निवडणुका त्यांनी जालना मतदारसंघातून लढविल्या. त्यापैकी चार वेळेस विजय मिळविला. १९९९मध्ये जालना मतदारसंघात ३ हजार ८८४ मतांनी त्यांचा गोरंटय़ाल यांनी पराभव केला होता. विजयी झालेल्या चारही निवडणुकांत खोतकर यांचे मताधिक्य मोठय़ा प्रमाणावर कमी-जास्त होत राहिले. यंदाच्या निवडणुकीत केवळ २९६ एवढय़ा कमी मताधिक्याने विजयी झालेल्या खोतकरांचे १९९५च्या निवडणुकीतील मताधिक्य काँग्रेस उमेदवारापेक्षा जवळपास ४२ हजार होते. १९९०मध्ये हे मताधिक्य ३६ हजारांपेक्षा अधिक होते.
मागील २५ वर्षांत खोतकर यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष, तसेच राज्य बँकेचे संचालक म्हणून काम पाहिले. युतीच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. जालना सहकारी साखर कारखान्याचे संचालकपद म्हणूनही त्यांनी काम पाहिले. जि.प., पंचायत समिती, सहकारी खरेदी-विक्री संघ, ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था नगरपालिका आदी गाव ते जिल्हा पातळीवरील संस्थांच्या राजकारणात ते गेली २५ वर्षे सक्रिय आहेत. गेल्या ५ वर्षांपेक्षा अधिक काळ ते जालना बाजार समितीचे सभापती आहेत.

pune dispute within congress marathi news
पुणे काँग्रेसमधील मानापमान नाट्य सुरूच
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?