अहिल्यानगर : जिल्ह्यातील गायवर्गीय सर्व जनावरांमध्ये लसीकरणाची मोहीम पूर्ण झाली असली, तरी लंपी आजाराचा प्रादुर्भाव आटोक्यात आलेला नाही. त्यामध्ये वाढ होऊन आता जिल्ह्यातील ३९९ गावांमधून प्रादुर्भाव जाणवला आहे. आतापर्यंत २६३० जनावरे बाधित झाली, त्यातील ७७ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.
जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दशरथ दिघे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या लंपी प्रादुर्भावामध्ये वासरे बाधित होण्याचे प्रमाण अधिक आहे. गेल्या जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात लंपीचा प्रादुर्भाव प्रथम राहता तालुक्यातील दाढ येथे आढळून आला होता. त्यानंतर तो लगतच्या परिसरात फैलावला.
पशुसंवर्धन विभागाच्या मागणीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी फैलावास प्रतिबंध बसण्यासाठी जनावरांचे प्रदर्शन भरवणे, शर्यती आयोजित करणे, बाजारात जनावरे आणण्यापूर्वी २८ दिवस आधी लसीकरण करणे असे प्रतिबंधक उपाय लागू केले. मात्र, अधिक प्रमाणात फैलाव होत आहे. पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार, सततच्या ढगाळ हवामानामुळे प्रादुर्भाव आटोक्यात येत नसला, तरी त्याचे प्रमाण कमी झालेले आहे.
यापूर्वी जिल्ह्यात सन २०२१-२२ मध्ये सध्याच्या तुलनेत अधिक प्रादुर्भाव जाणवत होता, तसेच जनावरे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाणही अधिक होते. ऑक्टोबर २०२३ मध्ये लंपी आजार आटोक्यात आल्याचे पशुसंवर्धन विभागाने जाहीर केले होते. मात्र, जुलै २०२५पासून हा प्रादुर्भाव पुन्हा जाणवू लागला. पशुसंवर्धन विभागाने त्या वेळी आणि आताही लसीकरणाची मोहीम राबवली. त्याने फैलावाचे प्रमाण कमी होण्यास मदत झाल्याचा दावा विभागाने केला आहे.
जिल्ह्यात नेवासा, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीरामपूर, कर्जत या तालुक्यांत तुलनेने अधिक प्रादुर्भाव जाणवत आहे. पशुपालकांनी जनावरांच्या गोठ्यात स्वच्छता ठेवणे, गोचीड व माशांचा प्रादुर्भाव रोखणे, त्यासाठी धुरीकरण करणे असे उपाय करणे आवश्यक आहेत. तसेच जनावरांचे बाजार भरवल्यानंतर बाजार समितीने त्या ठिकाणी फवारणी करणे आवश्यक असल्याची सूचना पशुसंवर्धन विभागाने केली आहे.
२६३० बाधित
जिल्ह्यातील ३९९ गावांतून २६३० जनावरे बाधित झाली आहेत. त्यातील १९९० जनावरे पूर्णतः बरी झाली आहेत. ७७ जनावरांचा मृत्यू झाला, तर ५६३ जनावरांवर उपचार सुरू आहेत. त्यातील ७ अत्यवस्थ आहेत. लागण झालेल्या जनावरांमध्ये ११११ वासरे आहेत. त्यांपैकी ८१० बरे झाले. जिल्ह्यात एकूण १३ लाख २९ हजार ६३९ गायवर्गीय जनावरे आहेत.
गाळप हंगामापूर्वी उपाययोजना
जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम लवकरच सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने जनावरांमध्ये लाळ्या खुरकूत प्रतिबंधक लसीकरण सुरू केले आहे. मात्र, हे लसीकरण लंपीबाधित गावे वगळून केले जात आहे. गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी म्हणजे ऑक्टोबरपूर्वी लसीकरण पूर्ण करण्याचे प्रयत्न असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दशरथ दिघे यांनी सांगितले.