महापुराने तोडल्या धर्मभेदाच्या भिंती! पुरामुळे अडकलेल्यांना मिळाला मदरशामध्ये आसरा!

कोल्हापूर जलमय झाल्यानंतर त्या दिशेने जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहे. त्यामुळे या वाहनांमधील प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे.

madrasah in shiroli kolhapur
पावसामुळे अडकलेल्या प्रवाशांची मदरशामध्ये झाली जेवणाची आणि राहण्याची सोय!

एरवी हिंदु आणि मुस्लिम बांधवांमध्ये सुरू असलेल्या तंटा-बखेड्याचीच वृत्तं कानावर पडत असताना कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात कोसळत असलेल्या पावसाच्या निमित्ताने हिंदू आणि मुस्लिम बांधवांमधल्या मूलभूत ऐक्याचा आदर्श वस्तुपाठच समोर उभा राहिला आहे. मुळात ऐक्य आणि बंधुभावाने राहण्याचा त्यांचा गुणधर्म पुन्हा एकदा ठसठशीतपणे समोर आला आहे. कोल्हापूरमध्ये शुक्रवारी दिवसभर अतीवृष्टी झाल्यानंतर आख्खं शहर जलमय झालं. त्यामुळे शहरात जाणारी सर्वच वाहनं शहराबाहेरच थांबवण्यात आली आहेत. त्यामुळे या सरकारी आणि खासगी गाड्यांमधल्या प्रवाशांची अन्न-पाण्याविना मोठी अडचण झालेली असताना त्यांच्या मदतीला शिरोलीमधील मुस्लिम बांधव पुढे आले आहेत.

२०० प्रवाशांना मिळाला आसरा

पुणे, देवगड, औरंगाबाद, सोलापूर अशा विविध भागातून मोठ्या संख्येने आलेली वाहनं महापुरामुळे पुणे-बंगळुरू महामार्ग बंद झाल्यानंतर शिरोली भागातच थांबवण्यात आली. त्यामुळे सरकारी एसटी बसेस आणि अनेक वाहनांच्या रांगा शिरोली भागातील महामार्गावर लागल्या. त्यावेळी शिरोलीतील मुस्लिम बांधवांनी वाहनांमध्ये अडकून पडलेल्या या प्रवाशांची जेवणाची आणि निवासाची सोय स्थानिक मदरशामध्येच केली. जवळपास २०० हून अधिक प्रवाशांना शिरोलीतील या मदरशामध्ये आसरा मिळाला आहे. एकूण ४ एसटी बसेस आणि ६ खासगी कारमधील प्रवाशांची या मदरशामध्ये सोय करण्यात आली आहे.

याबाबत कोल्हापुरातील राज्य परिवहन मंडळाचे चालक बंडु जाधव यांनी आपला अनुभव कथन केला. ते म्हणाले, “काल दुपारी पुण्याहून कोल्हापूरसाठी येण्यास निघालो होतो. सायंकाळी पाच वाजता शिरोली येथे आल्यानंतर पुढे रस्ता बंद होता. यामुळे शिरोली येथील मदरशांमध्ये राहण्याचे ठरवले. येथे राज्याच्या विविध भागातील १५ हून अधिक बसेस, खासगी वाहने थांबलेली आहेत. २०० पेक्षा अधिक लोक सध्या येथे उतरले आहेत. त्या सर्वांची निवास, भोजन यासह अन्य प्रकारची मोफत सुविधा करून देण्यात आली आहे. प्रसंगी औषधोपचारही केले जात आहेत”.

 

“प्रवाशांना कसली कमतरता भासू नये हा प्रयत्न”

दरम्यान, ही सगळी व्यवस्था करणारे मैनुद्दिन मुल्ला, शकील किल्लेदार आणि त्यांच्या गटानं प्रवाशांना कोणतीही कमतरता भासू नये यासाठी प्रयत्नशील असल्याचं म्हटलं आहे. “राष्ट्रीय महामार्गावर अडकलेल्या प्रवासी, वाहन चालक यांची सोय मदरशांमध्ये केले आहे. त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा पुरवले आहेत. चहा-नाश्ता, दोन वेळेचे जेवण याबरोबर त्यांच्या निवासाची सोय केली आहे. त्यांना कशाची कमतरता पडू नये याची काळजी आम्ही सर्वतोपरी घेत आहोत. इथे आम्ही करोना काळात रुग्णांच्या उपचारांची सोयही केलेली होती. त्यानंतर आता महापुरात अडकलेल्या लोकांची सोय करीत आहोत”, असं ते म्हणाले.

कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा; पावसाचा जोर ओसरला, मात्र पुराचे सावट अद्याप कायम!

घरची ओढ आणि भावनावशता!

मदरशांमध्ये उतरलेले काही लोक भावनावश झाले आहेत. विशेषता: महिलांना घरची ओढ लागली आहे. मुले घरी असल्यामुळे त्यांना चिंता भेडसावत आहे. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येताहेत. पण आम्ही सर्वजण त्यांना समजावून सांगत आहोत. या लोकांना कशाची उणीव राहणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेत आहोत, असेही मुल्ला म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Madrasah in shiroli near kolhapur helped passengers struck due to heavy rainfall pmw