भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे रिपाइं, रासप व शिवसंग्रामचे यशस्वी सोशल इंजिनिअरींग, नरेंद्र मोदींची लाट, मुंडेंची साथ सोडून पवारांकडे गेलेल्या आमदारांच्या विखारी प्रचाराचा रोष, त्यामुळे राष्ट्रवादीचे डझनभर आमदार-मंत्र्यांची फौज व जातीचे अस्त्रही निप्रभ करून मुंडेंनी बीडमध्ये मोठय़ा मताधिक्याने दिमाखदार विजय मिळवला. पाच वष्रे सत्तेची संपूर्ण ताकद लावूनही मुंडेंचे केवळ साडेचार हजारांचे मताधिक्य घटवण्याचीच कमाई अजित पवारांच्या पदरात पडली. विधानसभेच्या सर्वच क्षेत्रांत मुंडेंना मताधिक्य मिळाल्याने आगामी निवडणुकीची दिशाही स्पष्ट झाली आहे.
बीड मतदारसंघात मुंडे यांनी १ लाख ३६ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवत दुसऱ्यांदा खासदारकी मिळविली. राज्य स्तरावर शरद पवार व अजित पवार यांचे कट्टर विरोधक असलेल्या मुंडे यांना या वेळी पराभूत करण्यासाठी पवारांनी सत्तेची संपूर्ण ताकद लावून जिल्हय़ात दादा टीम तयार केली. मुंडेंचे आमदार फोडून विधानसभेचे सहापकी पाच मतदारसंघ खेचून घेतले. परळी हा एकमेव मतदारसंघ भाजपकडे आहे. दोन मंत्रिपदे, तसेच मुंडेंचे पुतणे धनंजय आणि गेवराईचे आमदार अमरसिंह पंडित यांना राष्ट्रवादीत घेऊन आमदार केले. पदवीधरचे सतीश चव्हाण यांच्यासह काही आमदारांनाही बीडच्या मदानातच तनात करून विकासनिधीच्या नावाखाली मोठी रसदही पुरवली. कोणत्याही परिस्थितीत मुंडेंना पराभूत करायचे, या इर्षेने राज्यमंत्री सुरेश धस यांना आखाडय़ात उतरवून ‘जातीचे अस्त्र’ सोडल्याने मुंडेंची कोंडी झाल्याचा देखावाही झाला. पण मुंडेंनी मराठा आरक्षणाचे प्रणेते आमदार विनायक मेटे यांना सोबत घेत हे अस्त्र निष्प्रभ केले.
रिपाइं खासदार रामदास आठवले यांच्यामुळे भाजपबरोबर कधी न येणारा दलित मतदारही जोडला. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यामुळे धनगर समाज, तर खासदार राजू शेट्टींमुळे शेतकरी संघटनेची भक्कम साथ मिळाली. आष्टी मतदारसंघातून माजी आमदार साहेबराव दरेकर व भीमराव धोंडे यांना सोबत घेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराची होम पिचवरच कोंडी केल्याने या मतदारसंघातून साडेआठ हजारांचे मताधिक्य मिळण्यास मदत झाली. शरद पवार यांनी दोन मुक्काम व सहा सभा घेऊन छोटय़ा छोटय़ा जात समूहांच्या प्रदेश स्तरावरील नेत्यांची फौज तनात केली होती. अजित पवारांनी स्थानिक नेत्यांना दम भरत कामाला लावले होते. मात्र, सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचण्याचे सर्व तंत्र वापरत सहानुभूती मिळवण्यास मुंडे यशस्वी झाले. आमदार अमरसिंह पंडित, धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके व उमेदवार सुरेश धस यांनी जिल्हा बँक, खासदार निधी या मुद्दय़ांवरून मुंडेंना घेरण्याचा प्रयत्न केला. मराठा, दलित, मुस्लिम एकगठ्ठा मिळणार असे गृहीत धरून मुंडेंविरुद्ध टीकेची झोड उठवली. या तुलनेत मुंडेंकडे परळीच्या आमदार पंकजा पालवे वगळता िखड लढवण्यास कोणीच नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी नेतृत्वासह स्थानिक आमदार व मंत्रीही मतदानानंतरही निवडून येण्याचा दावा करीत होते. प्रत्यक्षात मुंडेंनी केलेला सोशल इंजिनिअरींगचा प्रयोग मोठय़ा प्रमाणात यशस्वी झाला. मोदी लाटेमुळे सव्वा लाख नवमतदार भाजपच्या बाजूने झुकल्याने विजय सुकर झाला. परिणामी धस यांना स्वतच्या आष्टी मतदारसंघातही मुंडे-मोदींची लाट थोपविता आली नाही. साडेआठ हजारांचे मताधिक्य मुंडेंना मिळाले.
राष्ट्रवादीच्या विजयाचा विडा उचलणारे गेवराईचे विधान परिषद सदस्य अमरसिंह पंडित व आमदार बदामराव पंडित हे दोघे राष्ट्रवादीबरोबर असल्याने या मतदारसंघात अनेक मतदार केंद्रांवर भाजपला प्रतिनिधीही नव्हते. या मतदारसंघातून राष्ट्रवादीला ४० हजारांचे मताधिक्य मिळेल, असा दावा केला जात होता. प्रत्यक्षात दोन्ही पंडितांना नाकारून मतदारांनी मुंडेंना साडेएकतीस हजारांचे अधिक्य दिले. चार वष्रे राज्यमंत्री असलेल्या प्रकाश सोळंके यांच्या मतदारसंघातूनही भाजपला ३४ हजारांचे मताधिक्य मिळाले. तसेच दिवंगत विमल मुंदडा यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत निसटता विजय मिळालेल्या केज मतदारसंघातून या वेळी भाजपला ३२ हजार ६०० मतांचे अधिक्य मिळाले. आमदार धनंजय मुंडे यांनी परळीत प्रयत्नांची पराकाष्टा करूनही भाजपला २५ हजारांचे मताधिक्य मिळाले. केवळ पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या बीड मतदारसंघातच मोदी, मुंडेंची लाट काहीशी थोपवली गेली. मात्र, या मतदारसंघातूनही मुंडेंनाच पाच हजारांचे मताधिक्य मिळाले.
संग्रहित लेख, दिनांक 18th May 2014 रोजी प्रकाशित
मुंडेंचा करिष्मा कायम; पवारांची ताकद निष्प्रभ
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे रिपाइं, रासप व शिवसंग्रामचे यशस्वी सोशल इंजिनिअरींग, नरेंद्र मोदींची लाट, मुंडेंची साथ सोडून पवारांकडे गेलेल्या आमदारांच्या विखारी प्रचाराचा रोष, त्यामुळे राष्ट्रवादीचे डझनभर आमदार-मंत्र्यांची फौज व जातीचे अस्त्रही निप्रभ करून मुंडेंनी बीडमध्ये मोठय़ा मताधिक्याने दिमाखदार विजय मिळवला.
First published on: 18-05-2014 at 01:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Magic of gopinath munde continue power of sharad pawar weak