सातारा : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी २ ते ४ मे २०२५ या कालावधीत तीन दिवस महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. सह्याद्री अतिथिगृह येथे महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, एमटीडीसीचे मुख्य लेखा वित्त अधिकारी जितेंद्र सोनवणे उपस्थित होते.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व स्थानिक जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे २ मे २०२५ रोजी उद्घाटन होणार आहे.

या महोत्सवात स्थानिक लोक संस्कृतीचा समावेश असलेले कार्यक्रम तसेच नामांकित कलाकारांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन, महाबळेश्वर परिसरातील उदा. पाचगणी, कास पठार, कोयनानगर, तापोळा, गड-किल्ले दर्शन व इतर पर्यटन स्थळ, दर्शन सहलीचे आयोजन, पर्यटकांसाठी विविध श्रेणीचे तंबू निवास उभारणी करण्यात येणार आहेत.

पॅराग्लायडींग, पॅरामोटरींग, जलक्रिडा, ट्रेकींग, रॉक क्लायबिंग, घोडेस्वारी आदी विविध साहसी उपक्रम राबविणे, स्थानिक बचत गटांचे हस्तकला-कृतीचे प्रदर्शन व विक्रीचे दालन उभारणी, स्थानिक पाककलाकृती संस्कृती व खाद्यमहोत्सव दालन उभारणी, महाबळेश्वर येथील विविध प्रेक्षणीय स्थळे व पुरातन मंदिरांचे दर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहेत. या महोत्सवात विशेषतः देशांतर्गत विविध राज्यातील पर्यटन क्षेत्राशी निगडित भागधारक, प्रवासी संस्थांचे प्रतिनिधी, ट्रॅव्हल एजेंट, टूर ऑपरेटर्स, सोशल मीडिया प्रभावक यांना आमंत्रित करून त्यांचा समावेश असलेल्या परिचय सहलीचे आयोजन करण्यात येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाबळेश्वर हे ब्रिटिश काळापासून थंड हवेचे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या रांगा, त्यावरील दाट वनसृष्टी, वन्यजीव, झरे, नद्या, प्राचीन मंदिरे, गडकोट, ब्रिटिशकालीन बंगले, येथील रानमेवा, स्ट्राॅबेरीच्या बागा, वैशिष्ट्यपूर्ण वस्तू या साऱ्यांसाठी महाबळेश्वर देश-विदेशातील पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. येथे बाराही महिने पर्यटन हंगाम असला तरी उन्हाळ्यात या पर्यटनस्थळी पर्यटकांची मोठी गर्दी असते.