अलिबाग – आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने महाबळेश्वर पोलादपूर मार्ग पाच दिवस वाहतुकींसाठी बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. महाबळेश्वर पोलादपूर परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे आंबेनळी घाटात पोलादपूर हद्दीत पायटा गावाजवळ संध्याकाळच्या सुमारास भली मोठी दरड कोसळली.

सुदैवाने यात कुठलीही हानी झाली नाही. मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. दरड हटवण्यासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाने बॅरिकेटिंग करून दोन्हीकडची वाहतूक बंद केली आहे. यंत्रसामुग्रीच्या मदतीने दरड हटवण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे रायगड कडून महाबळेश्वरला  जाणाऱ्या प्रवाशांनी या मार्गावरील वाहतूक टाळावी असे आवाहन पोलादपूर तहसीलदार यांनी केले आहे.