राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर सध्या माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. मंगळवारी (११ जुलै) जानकर यांच्या जनस्वराज यात्रेचा माढ्यातील फलटण येथे समारोप झाला. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. जानकर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीबरोबर झालेल्या वाटाघाटीचा एक किस्सा सांगितला. जानकर म्हणाले, मागच्या लोकसभा निवडणुकीवेळी मी बारामतीमधून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी इच्छा भाजपाने व्यक्त केली होती. परंतु मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं, आत्महत्या करेन पण कमळ चिन्हावर निवडणूक लढणार नाही.

महादेव जानकर म्हणाले, मी वाहवत जाणारा माणूस नाही. एक काळ असा होता जेव्हा माझे सगळे सहकारी, मित्रपक्ष त्यांचं (भाजपाचं) चिन्ह घेऊन निवडणूक लढवू लागले होते. माझ्यावरही दबाव होता. मला त्यांनी सांगितलं तुम्हाला कमळ चिन्ह घ्यावं लागेल. मी त्यांना म्हटलं माझा राजीनामा घ्या, मी गावाकडं जाऊन शेती करेन किंवा मेंढरं राखेन. मला तुमची काही गरज नाही. मला हे सरकार नको आहे. मी तसं म्हटल्यावर त्यांनी मला सांगितलं तुमच्या चिन्हावर निवडणूक लढा.

हे ही वाचा >> राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांकडून अमोल कोल्हेंवर मोठी जबाबदारी, आता सांभाळणार ‘हे’ पद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महादेव जानकर म्हणाले, मी आमचं चिन्ह घेऊन लढत होतो. तेव्हा काहीजण मला म्हणाले बारामतीत तुम्ही कमळ घ्यायला पाहिजे होतं. मी म्हटलं आत्महत्या करीन पण कमळ (भाजपा), घड्याळ (राष्ट्रवादी) आणि हातावर (पंजा – काँग्रेस) कधीच निवडणूक लढणार नाही. आत्महत्या करीन पण लढणार नाही. मी लढलो, परंतु ६९ हजार मतांनी पडलो. त्यानंतरच्या निवडणुकीत (२०१९) भाजपाने कांचन कुल यांना बारामतीतून उमेदवारी दिली. त्या दीड लाख मतांनी पडल्या. त्यांच्याकडे कमळ होतं तर ते बारामतीत यायला पाहिजे होतं. आजही बारामतीची निवडणूक महादेव जानकरच लढू शकतो, हे मी चॅलेंज देऊन सांगतो.