Mahadevi Elephant : नांदणी मठातील महादेवी ऊर्फ माधुरी हत्तीण गुजरातमधील वनतारा पशुसंग्रहालयाकडे पाठवण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूरमधल्या नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिरोळ तालुक्यातील नांदणी ग्रामस्थांनी गेल्या दिवसांपासून सुरू केलेली ‘बॉयकॉट जिओ’ मोहीमही याच हत्तिणीला परत आणण्यासाठी ही मोहीम सुरु करण्यात आलं आहे. नांदणीच्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा हत्ती संगोपन केंद्रात हलवण्याच्या निर्णयाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेही महादेवी हत्तिणीला जबरदस्तीने गुजरातला नेलं आहे का असा सवाल केला आहे. सामनाच्या अग्रलेखातून महादेवी हत्तिणीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?
कोल्हापूरच्या नांदणी मठातील हत्तीण महादेवी उर्फ माधुरीने देशात अनेकांना चटका लावला. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणले. एका वृद्ध हत्तिणीने रांगड्या आणि टर्रेबाज कोल्हापूरकरांच्या डोळ्यांत अश्रू आणले. त्यामुळे माधुरी कोण? याचं संशोधन सुरु झालं. चाळीसेक वर्षे महादेवी नांदणीच्या जैन मठात होती. मठातील सर्व धार्मिक कार्यांत सहभागी होत होती. तिथे येणाऱ्या भक्तांनाही ती प्रिय होती. मठातर्फे माधुरीची देखभाल होत होती, पण आता थकलेल्या माधुरीस विश्रांती आणि अधिक देखभालीची आवश्यकात असल्याचं ‘पेटा’ या प्राणी मित्र संघटनेने ठरवले. प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आणि न्यायालयानेही पेटाचे म्हणणे मान्य केले. अंबानी परिवार गुजरातच्या जामनगरमध्ये आजारी, वृद्ध प्राण्यांसाठी वनतारा नावाचा एक उपक्रम चावलतो आहे. त्या वनतारात माधुरीस नेण्याचा प्रसंग आला तेव्हा संपूर्ण नांदणी गाव आणि कोल्हापूरकर वाटेत आडवे होऊन रडू लागले. माधुरीची वाट अडवू लागले.
महादेवी हत्तिणीला जबरदस्तीने गुजरातला नेलं आहे का?
सामनाच्या अग्रलेखात पुढे म्हटलंय, चाळीस वर्षांचा सहवास, गणगोत सोडून जाताना माधुरीचे पाय उचलत नव्हते. त्यामुळे माधुरीस जबरदस्तीने गुजरातला नेलं आहे काय? असा प्रश्न पडतो. माधुरीस एक प्रकारे प्राण्यांच्या वृद्धाश्रमात ढकललं गेलं आणि कोल्हापूरकरांचा त्यास विरोध आहे. माधुरीसाठी हजारो लोक रस्त्यावर आले, धाय मोकलून रडले याचा अर्थ नांदणी मठातून तिला प्राण्यांच्या वृद्धाश्रमात पाठवण्याची आवश्यकता नव्हती. माधुरी वनतारातून परत कोल्हापूरला यावी यासाठी आंदोलन सुरु आहे. माधुरी प्रकरणात जैन मुली आणि धर्माचार्यांनी भाजपाच्या नावे इशारा दिला. आचार्य गुणधर नंदीजी महाराज संतापाने म्हणाले की “देवेंद्र फडणवीस तुम्ही निर्दयी मुख्यमंत्री आहात. तुमच्या जीवनाचा मी धिक्कार करतो. देवेंद्र फडणवीस तु्म्ही अंबानींच्या मांडीवर बसून काम करत आहात.” जैन धर्मीय तसे संयमी, शांत, अहिंसक आणि धार्मिक प्रवृत्तीचे आहेत. मात्र माधुरी हत्तिणीच्या मुद्द्यावरुन हा समाज कमालीचा आक्रमक झाला आहे.
अंबानींचा प्रकल्प आहे म्हणून वनताराला नावं ठेवणार नाही
अंबानींचा वनतारा प्रकल्पात देशभरातील अनेक आजारी, जखमी, वृद्ध प्राण्यांची काळजी घेतली जाते. त्यामुळे हा प्रकल्प अंबानींचा आहे म्हणून टीका करण्यात अर्थ नाही. १८८३ मध्ये सर दिनशॉ माणेकजी पेटिट यांनी मुंबईतील परळ या ठिकाणी बैलघोडा रुग्णालय स्थापन केलं आहे. हे रुग्णालय प्राण्यांच्या देखभालीसाठीच उभरलं गेलं आहे. आजारी आणि जखमी हत्तींची काळजी घेणारं एक नर्सिंग होम श्रीलंकेत आहे. पेटाने नांदणी मठाच्या माधुरी हत्तिणीचा प्रश्न उचलून धरला आणि माधुरी हत्तिणीला भूतदयेच्या नावाखाली अंबानींच्या वनतारामध्ये पाठवलं. भारतात पेटाला इतकंच काम उरलं आहे का? भारताच्या रस्त्यांवर, उकिरड्यांवर, शहरांत आणि गावांमध्ये भटकी कुत्री वाढली आहेत. रस्त्यावर बेवारस गायी, बैल मोकाट फिरत आहेत त्यांना नीट अन्न मिळत नाहीत. गोशाळा निर्माण करुन हिंदुत्वाचं राजकारण सुरुच असतं. पण जनावरांना पाण्याअभावी तडफडावे लागते. या गायी, बैलांची माधुरीप्रमाणे पेटाने घेऊ नये आणि वनताराने या प्राण्यांची सेवा करु नये याचे आश्चर्य वाटतं. माधुरी हत्तिणीबाबत जितकी आस्था दाखवली गेली तशीच भूतदया इतर प्राण्यांविषयी दाखवणार नसाल तर माधुरीबाबतचा खेळ हे नाटक आहे असं मानावं लागेल. गरिबी, भुकेपाोटी माणूस माणसाला खातो आहे, मारतो आहे, लचके तोडतो आहे. याला जबाबदार सध्याचे गुजरात पॅटर्न राज्यकर्ते आहेत. त्या गुजरात पॅटर्न सरकारला भरघोस मतदान करणारे नांदणी मठातील माधुरीसाठी रडत आहेत, लढत आहेत, शाप देत आहेत. माधुरीचे भाग्य १४० कोटी जनतेला लाभो हीच प्रार्थना. कोल्हापूरकरांच्या लढ्याला शुभेच्छा. असं म्हणत अग्रलेखात भाष्य करण्यात आलं आहे.