‘महाअंनिस’चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांचा आरोप

धुळे  :  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील (महाअंनिस) लोकशाही, विकेंद्रितता आणि सामूहिक निर्णय प्रकिया अनेकदा संवाद करून देखील हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांच्या गटाला मान्य झालेली नाही. त्यामुळे घराणेशाही आणि वारसा हक्क जोपासणारा हा गट समितीपासून स्वतंत्र झाला आहे. या गटाने सात कोटी रुपये निधी असलेली संघटनेची विश्वस्त संस्था आपल्या ताब्यात घेतली आहे, असा आरोप महाअंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

पाटील यांनी केलेल्या या आरोपांमुळे महाअंनिसमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत.  महाअंनिसचे संस्थापक अध्यक्ष एन. डी. पाटील यांच्या निधनानंतर हमीद-मुक्ता गटाने अध्यक्ष म्हणून सरोजताई पाटील यांची निवड केली. परंतु, असा कोणताही निर्णय डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित समितीने घेतलेला नसल्याकडे अविनाश पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

हमीद-मुक्ता गटाचा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी कोणताही संबंध नाही. महाअंनिस जे काम करत आहे,  त्या कामाचे गुपचूप श्रेय घेण्याचा प्रयत्न करणे ही या गटाची कार्य पद्धती आहे. या गटात असणारे पाच-दहा लोक समितीच्या कोणत्याही पदावर नसताना चार, सहा महिन्यांतून एखादा कार्यक्रम समितीच्या नावाने घेऊन समितीविरोधात समांतर कार्यपद्धती ते अवलंबत आहेत. समितीच्या कामाशी संबंध नसताना अशी अध्यक्षाची निवड जाहीर करण्याचा हा खोडसाळपणा म्हणजे सार्वजनिक जीवनात संभ्रम निर्माण करुन फसवणूक करणे होय, असे पाटील यांनी म्हटले आहे.

संघटनेने सलग तीन दशके चालविलेले समितीचे मुखपत्र ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ हे मासिक  हमीद-मुक्ता गटाने ताब्यात घेतले. त्यानंतर संघटनेने अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका नावाचे नवे मुखपत्र सुरू केले आहे. महाराष्ट्र अंनिसच्या आर्थिक व्यवहारांसाठी १९९३ साली अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र नावाने सातारा येथे विश्वस्त संस्था स्थापन केली होती. प्रतापराव पवार हे या विश्वस्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर हे संस्थापक कार्याध्यक्ष होते, संघटनेतील सर्व कार्यकर्त्यांनी देणग्या आणि जाहिरातींच्या माध्यमातून वाढविलेली सुमारे सात कोटींची रक्कम अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र या विश्वस्त संस्थेत जमा आहे. हमीद-मुक्ता गटाने सात कोटी रुपये असलेली  संघटनेची विश्वस्त संस्था आपल्या ताब्यात घेतली आहे. त्या दरम्यान महाअंनिसने आर्थिक व्यवहारांसाठी विवेक जागर संस्था गठित करुन आपले कामकाज नियमितपणे सुरू ठेवले असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

एन. डी. पाटील संस्थापक अध्यक्ष असलेली आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेली आणि आपण कार्याध्यक्ष म्हणून असलेली महाअंनिसची संघटना सक्रिय असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.

हमीद- मुक्ता यांच्यावर     समांतर कार्यपद्धतीचा आरोप

अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करण्यासाठी व्यापक प्रयत्न आणि संघटनांची गरज आहे. असे संघटनात्मक काम हमीद- मुक्ता गटाने नक्की करावे, त्यासाठी नवीन संघटना स्थापन करावी, पण आधीपासून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाव वापरून समांतर कार्यपद्धती अवलंबून नये, असा सल्ला अविनाश पाटील यांनी दिला आहे.

‘आम्ही सामान्य कार्यकर्ते’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैयक्तिक आकसाच्या पोटी केलेले हे आरोप धादांत खोटे आहेत. आम्ही अंनिस ट्रस्टचे विश्वस्त नाही. या ट्रस्टमधून आम्ही कधीही मानधन किंवा प्रवासखर्चदेखील घेतलेला नाही. आम्ही अंनिस चळवळीतील सामान्य कार्यकर्ते आहोत आणि राहू. योग्य वेळी आम्ही आमची सविस्तर भूमिका मांडू.    – हमीद आणि मुक्ता दाभोलकर, कार्यकर्ते, महाराष्ट्र अंनिस