नागपूरमध्ये सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन विधानसभेत गदारोळ केला. विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांनी कर्जमाफीवर आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिले होते. सोमवारी विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले होते. मंगळवारी देखील विरोधकांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन आक्रमक पवित्रा घेतला. मंगळवारी कामकाज सुरु होताच विधानसभेत विरोधकांनी घोषणाबाजी सुरु केली. विरोधी बाकावरील सदस्य उभे राहिले. शेतकऱ्यांना कर्जमाफ झाले पाहिजे, न्याय द्या, न्याय द्या, शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, अशी कशी होत नाही घेतल्याशिवाय राहत नाही,अशा घोषणा त्यांनी दिल्या. यानंतर विरोधी पक्षातील आमदार विधानसभा अध्यक्षांच्या समोर येऊन घोषणा देत होते. यामुळे तीन वेळा कामकाज तहकूब करावे लागले. दुपारी १२ वाजता पुन्हा कामकाज सुरु होताच घोषणाबाजी सुरुच राहिल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

दरम्यान, तब्बल ३२ वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी विधानभवनावर विरोधकांचा हल्लाबोल मोर्चा धडकणार आहे. शेतकरी कर्जमाफी, बोंडअळीमुळे कपाशीचे झालेले नुकसान आणि विषारी कीटकनाशकांमुळे यवतमाळ जिल्ह्यात गेलेल्या बळींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला नाकर्तेपणाचा जाब विचारण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात काँग्रेसचे सुमारे दीड ते दोन हजार कार्यकर्ते सहभागी झालेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुमारे दोन हजार कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले आहेत.