कॉम्रेड गोिवद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ डाव्या पक्षांनी पुकारलेल्या रविवारच्या महाराष्ट्र बंदला रायगडात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्य़ातील बहुतांश बाजारपेठा बंद होत्या. पेण येथे सामाजिक संघटनांनी निदर्शने केली. बंदच्या काळात जिल्ह्य़ात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
कॉम्रेड गोिवद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ डाव्या पक्षांनी रविवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. रायगड जिल्ह्य़ात शेतकरी कामगार पक्षानेही बंदला पाठिंबा दिला होता. यामुळे जिल्ह्य़ात बंदला उदंड प्रतिसाद मिळाला. बाजारपेठा बंद होत्या. रविवार असल्यामुळे शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये आणि बँका बंदच होती. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट होता.
परंतु एसटी सेवाही नियमित चालू होती, मुंबई ते मांडवा आणि भाऊचा धक्का ते रेवस दरम्यान चालणारी जलवाहतूक सुरळीत सुरू होती. कोकण रेल्वेदेखील वेळेवर धावत होती. त्यामुळे दळणवळण व्यवस्थेवर बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही.  
बंदचा सर्वाधिक फटका बसला तो रायगड जिल्ह्य़ात आलेल्या पर्यटकांना. बहुतेक हॉटेल व्यावसायिक  बंदमध्ये सहभागी होते. आपले व्यवसाय बंद ठेवल्याने पर्यटकांवर उपासमारीची वेळ आली. तुरळक फळवाले सोडले तर पर्यटकांना वडापाव आणि पाणीसुद्धा मिळू शकले नाही. त्यामुळे विकेंड प्लािनग करून अलिबागमध्ये आलेल्या पर्यटकांचा पुरता भ्रमनिरास झाला.