Devendra Fadnavis On Sharad Pawar: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या खासदार शरद पवार यांचे कौतुक केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याबद्दल अनेक गोष्टी आवडतात असे सांगितले. याचबरोबर, शरद पवार जय-पराजयाचा विचार न करता सातत्याने काम करत राहतात, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

‘इंडियन एक्सप्रेस ग्रुप’च्या ‘एक्सप्रेस अड्डा’ या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शरद पवारांबद्दलच्या अनेक गोष्टी मला आवडतात. पण काही गोष्टी अशाही आहेत, ज्या मी स्वीकारत नाही. पण मी त्यांच्या सातत्याचे कौतुक करतो. या वयातही ते जिंकले, हरले किंवा परिस्थिती कशीही असली तरी काम करत राहतात.”

लव्ह जिव्हाद आणि व्होट जिहाद

या कार्यक्रमात काही प्रश्नांना उत्तरे देताना देवेंद्र फडणवीस यांनी लव्ह जिहाद, व्होट जिहाद यासारख्या गोष्टींवरही भाष्य केले. ते म्हणाले, “तरुण मोठ्या संख्येने आयसिसमध्ये का सहभागी होत आहेत? अल्पसंख्याकांचे कट्टरतावाद हे एक वास्तव आहे. तुम्ही वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. लव्ह जिहादप्रमाणेच, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात व्होट जिहादचा एक प्रकार घडला होता.”

लव्ह जिहाद या वादग्रस्त विषयावर आणखी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “जरी या शब्दावर अनेकदा चर्चा होत असली तरी, काही जिल्ह्यांमध्ये प्रेमसंबंधांच्या नावाखाली शोषणाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये लव्ह जिहाद ही एक वास्तविकता आहे.”

ते पुढे म्हणाले की, “जेव्हा लव्ह जिहादबद्दल गोष्टी बोलल्या जातात तेव्हा तुम्हाला कधीकधी ते अतिशयोक्ती वाटते. परंतु काही जिल्ह्यांमध्ये ही सत्य परिस्थिती आहे. अशी प्रत्येक घटना चिंताजनक नसली तरी, काही विशिष्ट घटनांमुळे चिंता निर्माण झाली आहे हे स्पष्ट आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंतरधर्मीय विवाहांच्या विरोधात नाही

फडणवीस यांनी यावेळी सहमतीने होणारे आंतरधर्मीय विवाह आणि जबरदस्तीने होणारे विवाह यावरही भाष्य केले. ते म्हणाले, “मी आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहांच्या विरोधात नाही. पण जेव्हा मुलींना लग्नासाठी प्रलोभन देऊन शोषण केले जाते तेव्हा तो एक गंभीर मुद्दा आहे.”