कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड कृषी प्रदर्शनासाठी बेकायदेशीर निधी गोळा केल्याचा तसंच गायरान जमीन एका व्यक्तीला विकल्याचा आरोप करत अजित पवारांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेत मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी अजित पवारांनी केली आहे. दरम्यान अजित पवारांच्या या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

अजित पवारांनी अब्दुल सत्तारांवर केलेल्या आरोपाबद्दल विचारण्यात आलं असता शिंदे म्हणाले की “त्याची माहिती घेऊ. विरोधी पक्षनेत्यांच्या प्रकरणाचीही माहिती घेऊ. सत्ताधाऱ्यांची माहितीदेखील घेऊ”.

अजित पवार विधानसभेत काय म्हणाले?

“नागपूर खंडपीठाने कृषीमंत्र्यांविरोधात कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी वाशीम जिल्ह्यातील १५० कोटींची ३७ एकर गायरान जमीन खासगी व्यक्तीला दिली. त्यांनी कायदेशीर बाबींचं उल्लंघन केलं आहे. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ठोस पुरावे आहेत. त्यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे. राज्य सरकार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय़ माहिती असतानाही एका व्यक्तीला फायदा मिळवून देण्यात आला. त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी,” अशी मागणी अजित पवारांनी केली.

Maharashtra Assembly Session: “हा निर्लज्जपणाचा कळस आहे, महाराष्ट्र फार अपेक्षेने तुमच्याकडे पाहतो”; अजित पवार फडणवीसांवर संतापले

दरम्यान सिल्लोड कृषि प्रदर्शनासाठी बेकायदेशीर निधी गोळा केल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला. “कार्यक्रम शासकीय नसतानाही पत्रिकेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री यांचे फोटो छापले आहेत. दादा भूसे कृषीमंत्री असताना असे कार्यक्रम घेण्यासाठी आम्ही बजेटमध्ये तरतूद केली होती. त्याबद्दल काही दुमत नाही. पण यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचे माझ्याकडे ठोस पुरावे आहेत,” असं अजित पवार म्हणाले.

“कृषी विभागाला वेठीस धरण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांनी आम्हाला काही माहिती नसल्याचं सांगितलं आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक कृषी दुकानदाराला पाच हजार रुपये वसूल करुन देण्यास सांगितलं आहे. हा एक प्रकारचा भ्रष्टाचार नाही का? याकरता मंत्री केलं आहे का?,” अशी विचारणा अजित पवारांनी फडणवीसांना केली.

Maharashtra Assembly Session: “तुम्ही मान खाली घालून गप्प आहात,” भास्कर जाधवांचा संताप; फडणवीस म्हणाले “कोणाच्या बापामध्ये…”

“गेल्या सहा महिन्यात त्यांच्याबद्दल सतत काहीतरी घडत आहे. महिला नेत्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात आली. दारु पिणार का? असं जिल्हाधिकाऱ्यांना विचारतात. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. त्या मंत्रिमंडळात तुम्हीही आहात. तुमच्या ११५ मुळे हे मंत्री झाले आहेत. तुम्हीही तितकेच जबाबदार आहात. तुमच्याकडे फार अपेक्षेने महाराष्ट्र पाहतो. तुम्ही ठरवलं तर राजीनामा घेऊ शकता,” असं अजित पवार फडणवीसांना उद्देशून म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सवाची शासनाने गंभीर दखल घेतली असून कुठे गैरप्रकार घडला असेल तर कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे.