महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता अयोध्येला जाणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार असणार आहेत. अयोध्येला जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेणार आहेत तसंच शरयू नदीच्या काठी पूजा आणि आरतीही करणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदार आणि खासदारांना घेऊन अयोध्येला जाणार अशी चर्चा होती. त्या दौऱ्याची तारीख अखेर ठरली आहे.

काय म्हटलं आहे भरत गोगावलेंनी?

धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आमचं ठरलं होतच की,प्रभू रामाचे दर्शन घ्यायचे. गुढीपाडव्याच्या दिवशीच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ६ ते १० एप्रिल हा आपला अयोध्या दौरा असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे जे बोलत आहेत ते पुर्णत्वास येत आहे. बाळासाहेबांचे विचार बरोबर घेऊन चाललं तर धनुष्यबाण कळायला काही हरकत नाही असं भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची जवळपास महिनाभरापासून याची चर्चा आहे. अयोध्या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे शरयू नदीकाठी धार्मिक विधींमध्ये भाग घेणार आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा असणार आहे. शिवसेनेत बंड करण्याआधी काही दिवस आदित्य ठाकरेंसोबत एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाताना मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर निघालेल्या आमदारांनाही सोबत घेऊन जाणार असल्याची चर्चा आहे. कारण, शिंदे यांचा हा अयोध्या दौरा राजकीय रणनितीचा एक भाग असल्याचं बोललं जातं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२१ जून २०२२ ला एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारही गेले. शिवसेनेत पडलेली ही सर्वात मोठी फूट आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी २९ जूनला राजीनामा दिला. ३० जून २०२२ ला एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे हे जून महिन्यात मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून हा त्यांचा पहिलाच अयोध्या दौरा आहे. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हा ते गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. यानंतर आमदारांना घेऊन नोव्हेंबर महिन्यातही ते कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते. आता पुढच्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौरा करणार आहेत.