पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेली आग नियंत्रणात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, “देशातील लसीकरण मोहिमेत सीरमचा सिंहाचा वाटा असून त्याच संस्थेत आग लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार कोव्हिडची लस तयार करणाऱ्या विभागाला आग लागलेली नाही. बीसीजी लस तयार केली जाते तिथे आग लागली होती. ही आग नियंत्रणात आली असून एकूण सहा जणांना बाहेर काढण्यात यश आलं”.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट आगीच्या तडाख्यात

बांधकाम सुरु असून विद्युत बिघाडामुळं आग लागल्याची प्राथमिक माहिती असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. काम नेमकं काय सुरु होतं याची माहिती संपूर्ण आग विझल्यानंतर येईल असंही ते म्हणाले. जीवीतहानी झाल्याची अद्याप कोणतीही माहिती नसल्याचंही ते म्हणाले.

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग

“अदर पूनावाला यांच्यासोबत माझं काही बोलणं झालेलं नाही. मी प्रशासकीय यंत्रणेकडून माहिती घेतली. सर्व शांत झाल्यावर मी सगळ्यांशी संवाद साधणार आहे. कोणाला फोन करुन त्रास दिलेला नाही. आग विझवण्याचं काम पूर्ण झालं की आपल्याला माहिती मिळेल. नुसतं मी फोन करुन काहीच होणार नाही,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. अग्निशन दलाच्या जवानांनी जीव धोक्यात घालून केलेल्या कामगिरीबद्दल उद्धव ठाकरेंनी त्यांचं कौतुक केलं. सध्या आहे ते सुरक्षित ठेवणं याला प्राधान्य असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंना यावेळी विरोधक यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करत आहेत याबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “त्यांच्याकडे ही माहिती कशी येते? सर्जिकल स्ट्राइक वैगेरे इतर गोष्टी कशा कळतात हे गुपित आहे. त्यांचं ज्ञान अगाध आहे. काही विद्या वैगेरे प्राप्त असेल, माहिती असेल तर जरुर द्यावी. त्यांना जरा संयमाची लस टोचण्याची गरज आहे”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cm uddhav thackeray press conference on serum fire in pune sgy
First published on: 21-01-2021 at 17:25 IST