एमपीएससी प्रकरणी राजकारण करणं योग्य नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी एमपीएससी प्रकरण हाताळण्यात कमी पडलं असं स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यातील करोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार पोहोचले होते. विभागीय आयुक्त सौरभ राव तसंच केंद्राच्या पथकातील सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुण्यात लॉकडाउन होणार नसल्याचं स्पष्ट केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार यांनी पुणेकर तसंच राज्यातील जनतेला करोना संकट गांभीर्याने घेण्याची विनंती केली. जास्तीत जास्त लसीकरण कसं करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असून केंद्राच्या आदेशाचं पालन करावं लागतं असं ते म्हणाले आहेत. काही बाबतीत नियमांचं पालन केलं जात नसल्याने नाईलाजास्तव आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागले आहेत असं यावेळी अजित पवारांनी सांगितलं.

मोठी बातमी! MPSC परीक्षेसाठी नवी तारीख जाहीर

“बैठकीत झालेले निर्णय एकमताने घेण्यात आले आहेत. ज्याप्रमाणे बेडची मागणी वाढेल त्यानुसार कोविड सेंटर पुन्हा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. सध्या रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती नाही,” अशी माहिती अजित पवारांनी दिली.

एमपीएससी परीक्षेच्या गोंधळावर बोलताना ते म्हणाले की, “यामध्ये राजकारण आणण्याची गरज नाही. एमपीएससी स्वायत्त संस्था आहे. त्याच्यात काहींनी राजकारण तापवण्याचा प्रयत्न केला. आमचा एमपीएससीच्या मुलांना पाठिंबा आहे मात्र सरकार काहीतरी वेगळं करतंय असं भासवण्याचा प्रयत्न झाला. त्यासंदर्भात मी दुपारीच मुख्यमंत्र्यांशी बोललो. यावेळी त्यांनी आपण स्वत: यामध्ये लक्ष घातल्याचं सांगितलं. त्यांनी एमपीएससीला सांगून विद्यार्थ्यांच्या बाबतीत वातावरण अशा पद्दतीने खराब करणं योग्य नसल्याचं सांगितलं”.

जर पूर्वनियोजित सगळं ठरलं होतं तर विद्यार्थ्यांवर अशी वेळ का आली असं विचारण्यात आलं असता अजित पवार म्हणाले की, “मी अजून एमपीएससीचा अध्यक्ष झालेलो नाही, झालो की याचं उत्तर देईन…मी पहिल्यांदाच सांगितलं की एमपीएससीने हे सर्व करत असताना व्यवस्थितपणे प्रकरण हाताळायला हवं होतं. एमपीएससी प्रकरण हाताळण्यात कमी पडलं हे माझं स्पष्ट वैयक्तिक मत आहे”.

“राज्याचे प्रमुख बोलले आहेत. आम्ही प्रमुखांच्या हाताखाली काम करत आहोत. उद्धव ठाकरेंनी निर्णय दिल्यानंतर त्याची अमलबजावणी करण्याचं काम सरकारकडून केलं जाईल आणि आमचा पाठिंबा राहील,” असं अजित पवारांनी सांगितलं. “झालं ती दुर्दैवी घटना म्हटलं पाहिजे. विद्यार्थ्यांवर रस्त्यावर उतरण्याची वेळ नाही आली पाहिजे,” असं अजित पवारांनी सांगितलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra deptuty cm ajit pawar pune coronavirus lockdown mpsc sgy
First published on: 12-03-2021 at 13:11 IST