राज्यातील रुग्णसंख्या घटल्याने काही भागात निर्बंध कमी करत दिलासा देण्यात आला आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना काही ठिकाणी मात्र वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत कोल्हापूर पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी कोल्हापुराती स्थितीचा आढावा घेतला असून कठोर निर्णय घ्यावे लागतील असा इशारा दिला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कोल्हापुरातील निर्बंध अजिबात शिथील करणार नाही. उलट नियम पाळले जात नसतील तर अधिक कडक करण्यात येतील असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागात काही त्रुटी दिसल्या का असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “त्यांनी त्यांच्या वतीने प्रयत्न केला. त्यांच्याकडूनच आपल्याला काम करुन घ्यायचं असून नाउमेद करुन चालणार नाही. म्हणूनच त्यांना काय अडचणी आहेत ते सागंण्यास सांगितलं आहे. आम्ही सुविधा देतो पण पहिल्या लाटेत केलं तसं आक्रमकपणे काम आत्ता काम केलं पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनीही सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे असंही सांगितलं आहे. तरीही फरक पडला नाही आणि ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी पार पाडली नाही तर कठोर निर्णय घ्यावे लागतील”.

…तर निर्बंध अजून कठोर करणार; अजित पवारांचा कोल्हापूरकरांना इशारा

“निर्बधांच्या बाबतीत कोल्हापूर चौथ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पॉझिटिव्हीचं प्रमाण कोल्हापुरात आहे. यामुळे येथे निर्बंध अजिबात शिथील केले जाणार नाहीत. उलट कोणी नियम पाळत नसतील तर अधिक कडक केले जातील. आम्ही निर्बंध लादण्यासाठी येत नाही. पण कोल्हापूरने लवकरात बाहेर पडावं यासाठी थोडा वेळ सोसावं लागणार आहे. सकाळी मी अनेकांना मास्कविना पाहिलं. काही जण मास्कऐजी रुमाल वापरतात आणि पोलीस दिसले की तो रुमाल लावतात, असं करु नका, तुम्ही आपलं आरोग्य धोक्यात घालत आहात, निष्पापांनाही याचा फटका बसत आहे. पोलीस, जिल्हाधिकाऱ्यांना निर्बंधांची कडकपणे अमलबजावणी करण्यास सांगितलं आहे,” असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

Maharashtra Lockdown:…तर राज्यात पुन्हा नव्याने निर्बंध; ठाकरे सरकारचा इशारा

“महाराष्ट्रात सध्या दुसरी लाट ओसरत असताना कोल्हापुरात प्रमाण जास्त आहे. कोल्हापूर पहिल्या क्रमांकावर आहे. पहिल्या लाटेत काम उत्तम झालं होतं. पण सध्या करोना आटोक्यात नाही त्याची काय कारणं आहेत; औषध, लसींचं परिस्थिती याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. लोकप्रतिनीधांशी चर्चादेखील केली. आज या दौऱ्यात येत असताना गृह विलगीकरण कमी करुन संस्थात्मक विलगीकरण झालं पाहिजे यावर भर दिला. फायर, ऑक्सिजन ऑडिट सुरु आहे. लहान मुलांसाठी टास्क फोर्स सुरु करण्यात आलं आहे,” अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली.

खासगी रुग्णालयांनी नियमाप्राणे बिलं लावावीत

“टेस्टिंग दीड ते दुप्पट वाढलं पाहिजे असं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे. टेस्टिंगनंतर रुग्णसंख्या सुरुवातीला वाढली तरी चालेल पण नंतर ते कमी होईल. टेस्टिंग न झाल्याने लोक बाहेर फिरत असतात, त्यामुळे इतरांनाही संसर्ग होतो त्यामुळे वाढवणं गरजेचं आहे,” असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं, दरम्यान खासगी रुग्णालयांनी नियमाप्राणे बिलं लावावीत, कारण नसताना जास्त बिल लावू नये अशी सूचनाही दिली असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

१ जुलैनंतर लस मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होईल

५ जुलैला पावसाळी अधिवेशन असून पुरवणी मागण्या घेतल्या जातील. कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा मुद्दा घेणार असून ते लवकरात लवकर दिलं जाईल असं आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिलं. तसंच सिरम आणि भारत बायोटेकने लसनिर्मिती वाढवली असून १५ जूननंतर किंवा १ जुलैनंतर लस मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

छत्रपती शाहू महाराज भेट

छत्रपती शाहू महाराज भेटीवर बोलताना ते म्हणाले की, “चहाच्या निमित्ताने मी गेलो होतो त्यामुळे अनेक विषयांवर चर्चा झाली”. मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने निर्णय़ दिला आहे. मोदींपुढेही हा मुद्दा मांडला होता. आमची काय मागणी होती तेदेखील सांगितलं होतं. आरक्षणाच्या संदर्भात बिल आणून ते मांडून कायदा करावा अशी विनंती केली होती असंही यावेळी ते म्हणाले.

नाना पटोले यांना फटकारले

“राज्यातील निवडणुकीबाबतचा अंतिम अधिकार काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे कोणी काही विधान करत असेल तर त्याला महत्त्व नाही,” असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. निवडणुका स्वबळावर निवडणूक लढवण्याचे विधान करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मताला त्यांनी महत्त्व नसल्याचे अधोरेखित केले.

जीएसटीवरून चंद्रकांत पाटलांना टोला

जीएसटी मंत्रिमंडळाकडे पाठपुरावा केल्यानंतर करोना वैद्यकीय साहित्यामध्ये सवलत मिळाली, असा उल्लेख करुन पवार म्हणाले केंद्र शासनाकडून जीएसटीचा परतावा राज्याला २३ हजार कोटी रुपये मिळणे बाकी आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. आम्ही मंत्रिमंडळात असल्याने खरी आकडेवारी आमच्याकडे उपलब्ध आहे. केंद्र शासनाने जीएसटीची रक्कम दिली असताना राज्य शासनाने ओरड करू नये असे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे हे अज्ञानातून आलेले आहे. त्यांना वास्तवातील आकडेवारी माहीत नसल्याने ते काहीही बोलतात. विनाशकाले विपरीत बुद्धि अशी त्यांची अवस्था झाली आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीतील महत्वाचे मुद्दे-

◆कोरोना नियंत्रणासाठी राज्य शासनाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्याला आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार

◆ कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नमुना तपासण्यांची संख्या वाढवा, बाधित दर अधिक असणाऱ्या गावांमधील सर्व नागरिकांच्या तपासण्या करुन घ्या

◆बाधित रुग्णांकडून संसर्ग फैलावू नये, यासाठी संस्थात्मक अलगीकरण प्रभावीपणे करुन सुविधा उपलब्ध करुन द्या

◆ सीपीआर, इंदिरा गांधी रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सेवा सुविधांसाठी निधी उपलब्ध करुन देणार

◆ साखर कारखान्यांनी प्राणवायू निर्मिती प्रकल्प आणि कोविड केअर सेंटर गतीने मार्गी लावावेत

◆परराज्यातून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची सक्तीने तपासणी करा

◆ १८ वर्षापुढील दिव्यांगांचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करा,

◆ रुग्णालयांचे फायर, इलेक्ट्रिकल, ऑक्सिजन ऑडिट करुन घेऊन त्रूटी दूर करा

◆रुग्णालयांच्या बिलाचे ऑडिट करुन अधिक दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई करावी.

◆तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लहान मुलांसाठी वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन द्या

◆ ग्रामविकास, आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त पदभरती गतीने भरण्यासाठी परवानगी

◆डोंगराळ भागासाठी रुग्णवाहिका देण्यात येईल

◆म्युकर मायकोसिसच्या रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार

◆आरोग्य विभागातील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांचे प्रलंबित मानधन लवकरात लवकर देणार