इंदापूर विधानसभा मतदार संघामध्ये विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीला विरोध केलेल्या गटाने थेट भाजप उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनाच पाठिंबा जाहीर केला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांचा पाठिंबा देणाऱ्यांत समावेश असल्याने राष्ट्रवादीसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या पाच वर्षांत जगदाळे यांनीच हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यातील तालुका खरेदी विक्री संघासह कृषी उत्पन्न बाजार समिती राष्ट्रवादीकडे खेचून आणली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगदाळे यांनी गेल्या वेळी भरणे यांना पाठबळ दिल्याचे मानले जात होते. त्यामुळे यंदा त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारीची अपेक्षा केली होती. मात्र, पक्षाने विद्यमान आमदार असलेल्या भरणे यांनाच उमेदवारी जाहीर केल्यामुळे नाराज झालेल्या जगदाळे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. जगदाळे यांच्या समर्थकांनीही भरणे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याने त्याचा काही प्रमाणात पक्षाला फटका बसण्याची शक्यता होती. त्यानुसार सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वेगवाग घडामोडी घडल्या आणि बंडखोरी न करता थेट भाजपच्या उमेदवारालाच पाठिंबा देण्याचा निर्णय जगदाळे यांच्यासह त्यांच्या गटाने घेतल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

(आणखी वाचा : हर्षवर्धन पाटील-भरणेंच्या कार्यकर्त्यांची पैज! जिंकणाऱ्याला मिळणार मताधिक्याएवढी रक्कम )

शेतीचे पाणी, बेरोजगारी, पंचतारांकित वसाहत, उजनी धरणग्रस्तांचे प्रश्न आदी तालुक्यातील चौदा प्रलंबित मागण्या मांडून त्या पूर्ण करण्याचा शब्द घेऊन जाहीर सभेत पाठिंबा देण्यात आला. तत्पूर्वी जगदाळे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अमरसिंह घोलप, राष्ट्रवादीचे तालुक्यातील नेते अशोक घोगरे, संजय निंबाळकर, विजयसिंह निंबाळकर आदी त्या वेळी उपस्थित होते.

दरम्यान, उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण तीसपैकी पंधरा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता पंधरा उमेदवार निवडणुकीच्या िरगणात आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra election 2019 harshvardhan jadhav bjp dattatray bharane ncp jagdale nck
First published on: 08-10-2019 at 08:50 IST