काँग्रेस, राष्ट्रवादीकडे उमेदवारांची वानवा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी १८३ उमेदवार निवडणूक िरगणात आहेत. यात शिवसेनेचे सर्वाधिक तर काँग्रेसचे सर्वात कमी उमेदवारांचा समावेश आहे.

निवडणुकीसाठी एकाही राजकीय पक्षाला संपुर्ण जागेवर उमेदवार देता आलेले नाही. स्थानिक पातळीवर केलेली युती आणि आघाडी हे यामागचे कारण असल्याचे सांगितले जात असले तरी त्यात फारसे तथ्य दिसून येत नाही. जिल्ह्य़ात सर्व तालुक्यात ताकद असलेला एकही राजकीय पक्ष उरलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. जिल्ह्य़ात शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना हे मोठे पक्ष आहेत. दोन वर्षांपासून भाजपनेही जिल्ह्य़ात पक्षबांधणीवर भर दिला आहे. पण तरीही सर्व जागांवर उमेदवार देताना राजकीय पक्षांची

ओढाताण झाल्याचे चित्र निवडणुकीत पाहायला मिळत आहे. शेकापसारख्या पक्षाला एकच उमेदवार दोन ठिकाणी देण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेचे सर्वाधिक ४५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. जिल्ह्य़ात मर्यादित ताकद असूनही भाजपने ३९ उमेदवार दिले आहेत. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने २४ उमेदवार दिले आहेत.

तर काँग्रेसला केवळ २० जागांवर उमेदवार देता आले आहेत. जिल्हा परिषदेवर कायम सत्तेत असणाऱ्या शेकापला ३१ उमेदवार निवडणूक िरगणात उतरवता आले आहेत. अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील यांना दोन वेगवेगळ्या मतदारसंघात उमेदवारी देण्याची वेळ पक्षावर आली.

जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यात उमेदवार देणारा शिवसेना हा जिल्ह्य़ातील एकमेव पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादीने अलिबाग, उरण, पनवेल, मुरुड चार तालुक्यात उमेदवार दिलेले नाहीत. शेकापने श्रीवर्धन, तळा, माणगाव, महाड, म्हसळा तालुक्यात उमेदवार दिले नाहीत. काँग्रेसने मुरुड, खालापुर, रोहा, सुधागड, पनवेल येथे उमेदवार उभे केलेले नाहीत. तर भाजपाने पोलादपुर आणि सुधागड तालुक्यात उमेदवार दिलेले नाहीत.

जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी ५९ पकी किमान ३० सदस्य निवडून येणे गरजेच आहे. शिवसेना, शेकाप आणि भाजप वगळता इतर पक्षांनी तेवढे उमेदवारच दिलेले नाही. दुसरीकडे स्वबळावर एवढय़ा जागा निवडून आणणे कुठल्याही एका पक्षाला शक्य असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेचे गणित युती आणि आघाडींच्या यशापशावर अवलंबुन राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra elections 017 shiv sena bjp ncp congress party
First published on: 19-02-2017 at 00:55 IST