Maharashtra Governer काहीही झालं तरीही हिंदीची सक्ती सहन करणार नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावर आंदोलन सुरु केलं. त्रिभाषा सूत्राला त्यांनी कडाडून विरोध दर्शवला. तसंच उद्धव ठाकरेंनीही त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. दरम्यान मराठी न बोलणाऱ्या व्यापाऱ्यांना राज ठाकरेंच्या मनसेचे कार्यकर्ते मारहाण करत असल्याच्या घटनाही समोर आल्या. त्यानंतर आता महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी या सगळ्या प्रश्नावर भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र नायक या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी राज्यपालांनी भाषेवरुन वाद का घालायचा? असा प्रश्न करत आपली सविस्तर भूमिका मांडली.

काय म्हणाले राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन?

“सध्याच्या घडीला मी वर्तमान पत्रांमध्ये वाचतो आहे की मराठीत बोलला नाहीतर मार खाल, तुम्हाला मारहाण होईल. तमिळनाडूतही भाषेचा वाद झाला होता. मी खासदार होतो, रात्री ९ वाजता एक वाद सुरु होता. मी चालकाला कार थांबवायला सांगितलं. जो जमाव होता त्यातले काही लोक मला पाहून पळून गेले, मी रात्री ९ वाजता येईन हे त्यांना अपेक्षित नसावं. जे लोक मार खात होते ते तिथे उभे होते. मी त्यांना विचारलं की काय झालं? ती माणसं माझ्याशी हिंदीत बोलू लागली. मला ती भाषा येत नाही. मग एका माणसाने मला सांगितलं की यांना तमिळ भाषा येत नाही म्हणून मारलं. बाकीचे लोक त्यांना मारत होते आणि सांगत होते की तमिळ भाषा बोला. आता मला जर मराठी येत नाही म्हणून कुणी मारहाण केली तर मला लगेच घडाघडा मराठी बोलता येईल? असा प्रश्न राज्यपालांनी विचारला.

महाराष्ट्रात लोकांना मारहाण झाली तर इथे गुंतवणूक येईल का?

हा प्रश्न उपस्थित करुन राज्यपालांनी आधीचा प्रसंग पुढे सांगितला. ते म्हणाले, “ज्यांना मारहाण झाली त्यांची मी क्षमा मागितली. त्यांना जेवू घातलं. ते लोक जेव्हा गेले त्यानंतर मी तिथून निघालो . मी हा प्रसंग सांगतो आहे कारण जर अशा प्रकारे भाषेच्या नावे दहशत पसरवली जात असेल तर मग महाराष्ट्रात गुंतवणूकदार येतील का? आपण दीर्घ काळासाठी महाराष्ट्राला वेदना देत आहोत. भाषा हा काही राजकीय पोळी भाजण्याचा मुद्दा नाही. मला हिंदी येत नाही ही बाब अडचणीची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दारिद्र्य रेषेखालील अनेकांना बाहेर काढलं आहे. त्यातल्याही पाच टक्के लोकांना हिंदी भाषाच बोलता येते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाषेच्या बाबतीत सहिष्णु वृत्ती बाळगली पाहिजे-राधाकृष्णन

“आत्ताही गिरीश महाजन यांनी जे सांगितलं तेव्हा मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहात होतो. मला ती भाषा कळत नाही. मी त्यांच्या चेहऱ्यावरुन काय बोलत आहेत याचा अंदाज बोलतो. मी हे सांगतो आहे कारण आपल्याला अनेक भाषा शिकता आल्या पाहिजेत. तसंच आपण आपल्या मातृभाषेचा अभिमानही बाळगला पाहिजे त्यात कुठलीही तडजोड असता कामा नये. माझ्यासाठी माझी मातृभाषा महत्त्वाची आहे तशीच ती प्रत्येक मराठी माणसासाठीही आहे. तसंच ज्याची जी मातृभाषा आहे त्यासाठीही माझं हेच म्हणणं आहे. आपण सहिष्णु वृत्ती बाळगली पाहिजे इतकंच माझं सांगणं आहे” असंही राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितलं.