मराठवाडय़ातील पाणीटंचाईवर कायमचा तोडगा काढण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान ही संकल्पना विकसित केली आहे. यातून निर्माण होणाऱ्या पाणीसाठय़ामुळे टंचाईवर तोडगा निघेल, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
पाणीटंचाई स्थितीवर येथे आयोजित उपाययोजना आढावा बठकीत ते बोलत होते. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, जि.प. अध्यक्षा प्रतिभाताई पाटील, खासदार सुनील गायकवाड, आमदार अमित देशमुख, संभाजी पाटील निलंगेकर, सुधाकर भालेराव, त्र्यंबक भिसे, विनायकराव पाटील, महापौर अख्तर शेख आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, टंचाई स्थितीवर नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानाची संकल्पना व्यवस्थित राबवली गेल्यास विकेंद्रित पाणीसाठे निर्माण होतील. लोकसहभागात नियोजन, अंमलबजावणी पातळीवरही हा सहभाग हवा. केवळ आर्थिक सहभाग पुरेसा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 या योजनेबद्दल लोकांमध्ये जागृती दिसून येत असून योजनेच्या प्रत्येक टप्प्यावर पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल. जूनअखेपर्यंत राज्यातील ५ हजार गावे टंचाईमुक्त होणार असल्याचे ते म्हणाले. शेतकरी आत्महत्या प्रश्नासंबंधी पथदर्शक प्रकल्प म्हणून उस्मानाबाद व यवतमाळ या दोन जिल्ह्य़ांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना सक्षम केले जाणार आहे. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोणीकर यांनी मनरेगा कामाचा वापर टंचाई दूर करण्यास व भूजलाची पाणीपातळी वाढवण्यासाठी केला जाणार असल्याचे सांगितले.
कृषी व पणन सचिव सुधीरकुमार गोयल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, मृद व जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख, कृषी आयुक्त विकास देशमुख, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government serious on marathwada water issue says devendra fadnavis
First published on: 06-03-2015 at 12:22 IST