मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यासह काही स्वातंत्र्यसैनिकांनी वास्तव्य केलेले लंडनमधील ‘ इंडिया हाऊस ’ महाराष्ट्र शासन ताब्यात घेऊन त्यास स्मारक म्हणून जतन करेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी येथे केले.

नागपूरकराच्या रघूजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार आणण्यासाठी लंडन दौऱ्यावर असताना शेलार यांनी इंडिया हाऊसला भेट दिली होती. त्यावेळी लंडनस्थित भारतीयांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनीही ही मागणी केली होती. त्यानुसार शेलार यांनी यासंदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. त्यास आमदार फरांदे, सामान्य प्रशासन, सांस्कृतिक कार्य, पुरातत्व विभागासह संबंधित विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

यासंदर्भात ‘ मित्रा ’ च्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यात सामान्य प्रशासन, सांस्कृतिक कार्य, पुरातत्व आणि वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असेल. या समितीने ‘इंडिया हाऊस’ ताब्यात घेण्याबाबतचा सर्वंकष अहवाल तयार केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादरीकरण करण्यात येणार आहे.

संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. या अनुषंगाने या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण शेलार यांच्याकडे करण्यात आले. हे प्रस्तावित स्मारक पाच एकर क्षेत्रात उभारले जाणार असून, पार्किंग आणि अन्य सुविधांसाठी अतिरिक्त दोन एकर जागा शासनाने घेतली आहे. हे स्मारक वेगवेगळ्या टप्प्यात करून स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर भव्यदिव्य व्हावे, अशी मागणी माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली होती. त्यासंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात संकल्पचित्रानुसार मुख्य स्मारकाचे काम करण्याचे निर्देश शेलार यांनी दिले. आजूबाजूच्या परिसरात पर्यटकांसाठी सेवा, सुविधा व विकासाबाबतच्या सूचनांचा अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करावा, अशा सूचनाही शेलार यांनी दिल्या.