राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याच्या विधानसभेचे सचिवांना ३० जून रोजी विशेष अधिवेशन घेण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधातील विश्वासदर्शक ठराव या एकमेव उद्देशासाठी हे अधिवेशन बोलावण्यात यावे असं राज्यापालांनी पाठवलेल्या पत्रात म्हटल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

नक्की वाचा >> Maharashtra Political Crisis: “उद्या मुंबईत येतोय, बहुमत चाचणीला हजर राहणार”; कामाख्या मंदिरातून एकनाथ शिंदेंची घोषणा

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आल्याने सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी मागणी करणारे पत्र भाजपाने मंगळवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर केले होते. शिंदे यांच्या बंडानंतर भाजपाने प्रथमच या राजकीय लढाईत उडी घेतल्याचं दिसून आलं. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी दिल्लीत भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन रात्री मुंबईत परतले. त्यानंतर फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ‘‘शिवसेनेच्या ३९ आमदारांनी वेगळी भूमिका घेतली आहे. याशिवाय काही अपक्षांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. ४६ आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने बहुमत गमावले आहे. त्यामुळे सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे,’’ अशी मागणी भाजपाने केली होती.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना धमक्या दिल्या जात आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत हे धमकीयुक्त भाषा वापरत आहेत, याचा उल्लेख भाजपच्या पत्रात करण्यात आला आहे.  शिवसेनेचे ३९ आमदार महाविकास आघाडीबरोबर नाहीत किंवा त्यांचा या सरकारला पाठिंबा नाही. या साऱ्या घडामोडींमुळे राज्यपालांना पत्र सादर केल्याचे फडणवीस यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले होतं.