|| एजाज हुसेन मुजावर

सोलापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्यामुळे सर्वदूर ओळख असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील राजकारणाचा बाजच वेगळा. खून-खराबा, अपहरण हे प्रकार अक्कलकोटकरांना नवीन नाही. काँग्रेस व भाजप या दोन पक्षांभोवताली फिरणाऱ्या तालुक्याच्या राजकारणात आता राष्ट्रवादी काँग्रेसने बस्तान बसविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर असताना राष्ट्रवादीने आपली ताकद वाढविण्यावर भर दिला आहे. अक्कलकोटमध्ये काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही मित्रपक्षांतील नेत्यांना फोडण्याचा सपाटा राष्ट्रवादीने लावला आहे. नव्या ताकदीच्या नव्या तरुण चेहऱ्यांनाही पक्षात आणून बळ देण्यात राष्ट्रवादी पुढे असल्याचे मानले जाते. अक्कलकोटमध्ये बस्तान बसविण्यासाठी राष्ट्रवादीने विशेषत: तेथील काँग्रेसच्या नेतृत्वालाच आपलेसे करण्याचा प्रयत्न करून पाहिला. परंतु हे नेतृत्व चलबिचल झाल्यामुळे राष्ट्रवादीने त्यांचा नाद सोडून नव्या दमाच्या आणि तरुण चेहऱ्याचा शोध घेतला आहे. गोकुळ साखर कारखान्याचे ३६ वर्षांचे अध्यक्ष दत्तात्रेय शिंदे हे राष्ट्रवादीच्या संपर्कात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे यांना ताकद देण्याचे संकेत दिले. अजित पवार यांच्या पाठोपाठ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही गोकुळ साखर कारखान्याला सदिच्छा भेट देऊन अत्याधुनिक स्वयंचलित साखर कारखान्याची तीन तास पाहणी केली आणि शिंदे यांना राष्ट्रवादीकडून निश्चितपणे बळ मिळण्याची ग्वाही दिली. अक्कलकोट आणि लगतच्या दक्षिण सोलापूर तालुक्यात राष्ट्रवादी भक्कम होण्यासाठी दत्ता शिंदे यांच्या नेतृत्वाकडे पाहिले जात आहे. शिंदे यांचा राष्ट्रवादी प्रवेशाची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात अक्कलकोटसह शेजारच्या दक्षिण सोलापूर तालुक्याचा काही भाग जोडला गेला आहे. याच मतदारसंघात धोत्री येथे शिंदे यांचा गोकुळ साखर कारखाना नव्या जोमाने कार्यरत आहे. दैनंदिन पाच हजार मे. टन ऊस गाळप क्षमतेने चालणारा हा साखर कारखाना पूर्णत: अत्याधुनिक तंत्रज्ञानावर उभारला गेला आहे. १८ मेगावाट सहवीज निर्मितीचा प्रकल्पही कार्यरत आहे. येत्या वर्षात इथेनॉल निर्मितीही होणार आहे. शिंदे कुटुंबीयाची आतापर्यंत अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेसचे नेते सिध्दाराम म्हेत्रे यांच्याशी अनेक वर्षे जवळीक होती. २०१६ साली शिंदे आणि म्हेत्रे यांनी एकाचवेळी दोन साखर कारखाने उभारले होते. एक कारखाना धोत्री येथे तर दुसरा कारखाना म्हेत्रे यांच्या दुधनी गावाजवळ. दुधनीचा मातोश्री लक्ष्मी साखर कारखाना म्हेत्रे कुटुंबीयांच्या ताब्यात तर धोत्रीचा गोकुळ साखर कारखाना शिंदे कुटुंबीयांच्या ताब्यात आहे शिंदे यांनी गोकुळच्या माळरानावर पुन्हा नंदनवन फुलविले आहे. एवढेच नव्हे तर शेजारच्या तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गचा गेली अनेक वर्षे बंद पडलेला तुळजाभवानी सहकारी साखर कारखानाही १५ वर्षांच्या भाडे कराराने शिंदे यांनी चालवायला घेतला आहे. तो कारखाना पुन्हा सुरू झाल्यामुळे तेथील ऊस उत्पादक शेतकरी खुशीत आहेत. दत्ता शिंदे यांच्याकडे अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्याची सूत्रे देण्याचे संकेत राष्ट्रवादीने दिले आहेत.

अक्कलकोटच्या राजकारणात कन्नड भाषक वीरशैव लिंगायत समाजाचे प्राबल्य आहे. विशेषत: हा लिंगायत समाज अलीकडे २५ वर्षांत भाजपच्या पाठीशी सातत्याने उभा राहिला आहे. भाजपचे स्थानिक आमदार सचिन कल्याणशेट्टी हे पकड ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचे प्रमुख विरोधक काँग्रेसचे सिध्दाराम म्हेत्रे हे असले तरी त्यांचा मातोश्री लक्ष्मी साखर कारखाना मोठ्या अडचणीत सापडला आहे. थकीत ऊस देयके मिळण्यासाठी तुळजापूर भागातील शेतकऱ्यांनी सोलापुरात येऊन काँग्रेस भवनासमोर अनेक दिवस आंदोलन केले होते. त्यामुळे म्हेत्रे यांची प्रतिमा आणखी मलिन झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद मराठा समाजाचे दत्ता शिंदे यांच्या पाठीशी उभी करण्याचे संकेत दिले आहेत. शिंदे हे या माध्यमातून राजकारणात नव्यानेच पदार्पण करणार आहेत. पण त्यांचे यशापयश त्यांच्या साखर कारखानदारीवर अवलंबून असल्याचे मानले जाते.

वीरशैव लिंगायत समाजाचे प्राबल्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अक्कलकोटच्या राजकारणात कन्नड भाषक वीरशैव लिंगायत समाजाचे प्राबल्य आहे. विशेषत: हा लिंगायत समाज अलीकडे २५ वर्षात भाजपच्या पाठीशी सातत्याने उभा राहिला आहे. भाजपचे स्थानिक आमदार सचिन कल्याणशेट्टी हे पकड ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचे प्रमुख विरोधक काँग्रेसचे सिध्दाराम म्हेत्रे हे असले तरी त्यांचा मातोश्री लक्ष्मी साखर कारखाना मोठ्या अडचणीत सापडला आहे.