महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही कर्नाटकच्यावतीने महाराष्ट्रातील जनतेच्या मनात चीड निर्माण करणारी वक्तव्ये केली जात आहेत. महाराष्ट्राच्या विधीमंडळात कर्नाटक प्रशासनाचा निषेध करणारा ठराव समंत झाल्यानंतर आज विधानपरिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंबंधी झालेल्या चर्चेला उत्तर दिले. कर्नाटकमध्ये राहणाऱ्या मराठी माणसांवर अन्याय अत्याचार होत असतील तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला. तसेच कर्नाटकला सडेतोड उत्तर देत असतानाच विरोधकांनाही चिमटे काढले.
महाराष्ट्र नेहमीच समन्वयाची भूमिका घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असतो असे सांगताना मुख्यंमत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सीमावादाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना दोन्ही राज्यांची जबाबदारी आहे की, न्यायालयाचा मान राखला गेला पाहीजे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून कर्नाटककडून सीमाभागातील मराठी माणसांवर अन्याय करण्याचा प्रकार केला आहे. दुसरीकडे आम्ही मात्र मानवतावादी दृष्टीकोन ठेवून काम करतोय.
मुंबईवर संकट आल्यानंतर मुंबई एकजूट होते
कर्नाटकामधील एका मंत्र्यांने कालच मुंबई केंद्रशासित प्रदेश करा, असे वक्तव्य केले. सभागृहाने याचा निषेध केला आहेच. मी देखील कडक शब्दात याचा निषेध करतो. मुंबई ही कोणाच्याही बापाची नाही, ती महाराष्ट्राची आहे. मुंबईवर जेव्हा जेव्हा संकटे आली, तेव्हा तेव्हा मुंबईकर हा एकजुटीने उभा राहून त्याला तोंड देतो. कोविडच्या काळातही आपण हेच पाहिले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनीही वेळोवेळी मुंबईचे रक्षण केलेले आहे. १०५ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबई आपल्याला मिळाली आहे.
कर्नाटकातील कानडी भाषिक लोक मला भेटले आणि…
मुंबई आणि महाराष्ट्रात कर्नाटकातील अनेक लोक गुण्या-गोविदांने इथे राहतात. यापैकी अनेकजण मोठे व्यवसाय करत आहेत. जेव्हा कर्नाटक सरकारने मराठी माणसांवर अन्याय सुरु केला, तेव्हा मुंबईतील कानडी लोक मला भेटले. ते म्हणाले, आम्ही महाराष्ट्राच्या मातीत राहतो. इथे व्यवसाय-उपजीविका करतो. त्यामुळे आम्ही अशाप्रकारच्या कृत्याचं कधीच समर्थन करणार नाही. त्याचा निषेधच आम्ही करु, अशी भूमिका त्यांनी घेतली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मराठी माणूस आग आहे. या विस्तवाशी खेळण्याचा कुणीही प्रयत्न करु नये. असे मुख्यमंत्री म्हणून मी सांगू इच्छितो, असा इशारा देखील शिंदे यांनी दिला.