संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी पाहायला मिळाली. पोटनिवडणुकीत पुरोगामी विचारातून सुरू झालेला प्रचाराचा मुद्दा हिंदूत्वाच्या वळणावर येऊन ठेपला होता. हिंदूत्ववादी विचारसरणीच्या मतदारांना आपल्याकडे खेचण्याच्या अखेरच्या टप्प्यात महाविकास आघाडी आणि भाजपा या दोन्हीकडून जोरदार प्रयत्न केला आहे. हिंदूत्ववादी आकर्षण असलेले शिवसेनेचे मतदार पक्षाच्या आदेशानुसार आघाडीकडे राहणार की भाजपाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘कमळा’कडे झुकणार यावर निर्णयाचा कल अवलंबून आहे.

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली असताना यापूर्वी या मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणुकीत उतरलेले आणि आता भाजपाचे उमेदवार सत्यजीत कदम यांना भाजपने उमेदवारी दिली होती. गेले काही दिवस मविआ आणि भाजपाच्या राज्यभरातील प्रमुख नेत्यांच्या तोफा धडाडत राहिल्या. त्यामुळे आता या निकालाकडे सर्वाचेंच लक्ष लागले आहे.

सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्ष विजयाचा दावा करत आहेत. कोल्हापूरच्या जनतेने कोणाची निवड केली, हे काही तासांतच कळेल. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार २.९० लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ३५७ मतदान केंद्रांवर हे मतदान पार पडले होते.

६० टक्क्यांहून अधिक मतदान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी ६० टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. डिसेंबर २०२१ मध्ये काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे या जागेवर पोटनिवडणूक झाली. एका निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले की, ६०.०९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.