छत्रपती संभाजीनगर : धान्य दळणारं जातं, शिंदीच्या डाली, सूप, खटारा, मुलांचा लाकडी चाकाचा गाडा या वस्तू, खेळणे आता तसे ग्रामीण जीवनातूनही हद्दपार झालेल्या आहेत. पण तरी आता त्या शहरातही दिसणार असून, ग्रामीण भागातील आठवणी जागवणार आहेत.

जातं-रोबोट, डाल-माऊस, ग्रामोफोन-सीसीटिव्ही, असं इतिहास जमा विरुद्ध तंत्रज्ञान युगातील वस्तूंची चिन्हं मिळालेली नगरपालिका निवडणूक किंवा त्यातला चिन्हंबोध प्रचार पाहणे रंजकदार ठरणार आहे. फणस विरुद्ध कणीस आणि ऊस व द्राक्षांमध्येही लढत दिसणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरपालिका लढतीमध्ये मिळणाऱ्या चिन्हांची सूची निवडणूक परिशिष्ट ड मधून प्रसिद्ध झाली असून, त्यामध्ये सुमारे १६५ चिन्हांचा समावेश आहे. ग्रामीण जीवनासह आधुनिक काळात वापरल्या जाणाऱ्या वस्तुंचा यामध्ये समावेश असून, त्यामध्ये अनेक या कालौघात इतिहास जमा झालेल्या आहेत, तर तंत्रज्ञानाशी जोडलेल्या जीवनात आता जगण्याचा एक भाग झालेल्या आहेत.

काही चिन्हे शेतकरी ते जेवणाच्या ताटातून पदार्थ बनून समोर येणारे आहेत. जेवणाचे पदार्थांनी भरलेल्या तबका-सोबतच मिरची, ढोबळी मिरची, लसूण, फुलकोबी, मका, सफरचंद, पेरू, अननस, नारळ, कलिंगड, असे फळ-भाज्यांचेही चिन्हे आहेत.

अगदी पोळपाट, भाजणीपात्र (फ्राइंगपॉट), गॅस सिलिंडर, काटेरी चमचा, कढई, खलबत्ता, कपबशी, बिस्किट, ब्रेड, टोस्ट तयार करणारे यंत्र- टोस्टरसह असे जेवण, स्वयंपाकगृहाशी संबंधित येणाऱ्या वस्तुंची चिन्हे असून, त्यावरून एखाद्या लसूण चिन्हधारी उमेदवाराने आपल्याशिवाय तडक्याला अर्थ नाही किंवा मिरचीचे चिन्ह मिळालेल्या उमेदवाराने आपल्याशिवाय भाजीला झणझणीतपणा नाही, असे म्हणत प्रचार केलाच तर नवल वाटणार नाही. केस विंचरायचा कंगवा टुथब्रश व दातांची पेस्ट, असेही चिन्हे असून, पेस्टशिवाय ब्रश अधुरा, कंगव्याशिवाय भांग पाडता येणार नाही, अशा अंगानेही प्रचारात रंगत भरण्याची शक्यता आहे.

निवडणुकीच्या चिन्हांमध्ये क्रीडा क्षेत्रातील वस्तुंचे चिन्हे असून, त्यामध्ये बुद्धिबळ पट, कॅरम, बॅडमिंटनमधील फूल, फुटबॉल, डंबेल्स, बॅटसह ट्रॅक्टर, हायवा, संगीत क्षेत्रातील बासरी, गिटार, हेडफोन व बांधकाम, संगणक, टाइपरायटर, अशा तंत्रज्ञानाशी संबंधित चिन्हांचा समावेश आहे.