राज्यसभेप्रमाणेच विधानपरिषदेची निवडणुकही अत्यंत चुरशीही होणार असल्याचं स्पष्ट होत आहे. मतदानासाठी अखेरचे काही तास शिल्लक राहिलेले असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव शिलेदार राजू पाटील हे मतदानासाठी विधानसभेमध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास दाखल झाले. यावेळेस प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना काही प्रश्न विचारले असता त्यांनी, ‘गृहित धरु नये’ असं सांगत राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही आपल्या मताबद्दलचं उत्सुकता पुन्हा वाढवली.
नक्की वाचा >> “राजसाहेब लवकरात लवकर बरे व्हा, नाहीतर विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर फडणवीस…”; शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांचा टोला
राज्यसभेच्या मतदानावेळी मनसेचे एकमेव आमदार असणारे राजू पाटील खूप चर्चेत आले होते. आज विधानभवनाच्या आवारामध्ये विधानपरिषदेच्या मतदानासाठी दाखल झाल्यानंतर राजू पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना विधान परिषदेच्या मतदानाबाबत पुन्हा चर्चांना तोंड फोडलं आहे. “कोणी गृहित धरु नये की आम्ही भाजपाला मतदान करणार किंवा कुठल्या दुसऱ्या पक्षाला मतदान करणार,” असं राजू पाटील म्हमाले आहेत.
“मागच्या वेळेसही आम्ही व्यक्ती बघून मतदान केलं होतं. त्यांनी राज ठाकरेंकडे विनंती केलेली, त्या अनुषंगाने आम्ही मतदान केलं होतं. लोकशाहीमध्ये मतदान हे पवित्र कर्तव्य असून तुम्ही मागच्या वेळेस पाहिलं असेल की एका मताची किंमत किंवा ते मत किती महत्वाचं असतं,” असं राजू पाटील म्हणाले.
नक्की वाचा >> “शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिवस किती उत्साहात…”; ‘हे’ चार फोटो पोस्ट करत निलेश राणेंनी शिवसेनेसहीत मुख्यमंत्र्यांना केलं लक्ष्य
पुढे बोलताना, “मी काल रात्री राज ठाकरेंना रुग्णालयामध्ये भेटायला गेलो होतो. त्यांनी मला काही निर्देश दिलेले आहेत. त्याप्रमाणे मतदान होईल,” असं राजू पाटील यांनी स्पष्ट केलंय. राज ठाकरेंची तब्बेत कशी आहे? असा प्रश्न राजू पाटील यांना विचारण्यात आला. “एकदम चांगल्या मूडमध्ये होते ते रात्री मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा. गप्पा चालू होत्या. शस्त्रक्रियेसाठी ते मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या तयार आहेत,” असं राजू पाटील यांनी सांगितलं. “आता त्यांची शस्त्रक्रिया सुरु असेल. मी मतदान करुन लगेच तिकडे जाणार आहे,” अशी माहितीही त्यांनी दिली.