Maharashtra Politics top 5 Political news : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हलचालींना वेग आला आहे. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. यादरम्यान महाविकास आघाडीमध्ये मनसेला स्थान द्यायचे की नाही याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
१) आगामी निवडणुकांमध्ये मविआ मनसेला बरोबर घेणार? काँग्रेस व राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज (११ नोव्हेंबर) मुंबईत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत घेणार का? यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे म्हणाले, “महाविकास आघाडीसमोर असा प्रस्ताव अद्याप आलेला नाही. तसा प्रस्ताव आल्यास आम्ही त्यावर एकत्र बसून चर्चा करू आणि निर्णय घेऊ.”
यावर काँग्रेसचं मत विचारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “मी प्रदेशाध्यक्ष म्हणून याआधीही सांगितलं आहे की चर्चेतून आम्ही निर्णय घेऊ.”
“मनसेला बरोबर घेण्याबाबत कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे चर्चेचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रस्ताव आल्यास मविआ व इंडिया आघाडीचे घटकपक्ष म्हणून आम्ही एकत्र बसून चर्चा करू आणि सर्व घटकपक्ष मिळून निर्णय घेऊ. आम्ही महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकत्र आहोत,” असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.
२) “दिल्ली हल्ल्यामुळे पंतप्रधान मोदींच्या आश्वासनांची पोलखोल”, नाना पटोलेंची टीका
काँग्रेसचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्ली येथे झालेल्या घटना नंतर केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. नागपूर मध्ये प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. नाना पटोले म्हणाले, आम्हीच करू शकतो अश्या पद्धतीने आश्वासन देऊन लोकांना मूर्ख बनवले. आता कश्मीर असुरक्षित आहे, छप्पन इंचाची छाती आता कुठे गेली आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही. दिल्लीत आणि केंद्रात यांचे सरकार असताना हे आतंकवादी या ठिकाणी आले कुठून असा प्रश्न निर्माण होत आहे. नरेंद्र मोदींनी दिलेल्या खोटे आश्वासनाची पोलखोल आता झाली आहे. हा भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. पुलवामा, पहेलगाम हल्ला झाला तेव्हा सरकारच्या सोबत होतो. मात्र पहेलगाम, पुलवामाच्या घटनेनंतर राजकारण केलं नाही. मात्र सरकार त्यानंतर हे काही करू शकले नाही आतंकवादाला पकडू शकले नाही. हे केंद्र सरकारचे अपयश आहे. त्याची जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारावी. निवडणुका लढणे आणि पक्ष जिंकवणे अशा पद्धतीची भाजपची भूमिका असते. देश हित आणि सुरक्षेबद्दल त्यांच्याजवळ कुठलाही योजना नाही.
3) बाह्य किंवा अंतर्गत शक्तीचा हात आहे का? दिल्ली स्फोटानंतर प्रकाश आंबेडकरांचा सवाल
दिल्लीत काल सायंकाळी झालेल्या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटाचा कसून तपास केला जात आहे. यादरम्यान वंचित बहुजन आघाडी पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. “दिल्लीतील स्फोट हे पूर्णपणे सरकारचे अपयश आहे. दिल्ली स्फोटामागे बाह्य किंवा अंतर्गत शक्तीचा हात आहे का? ते म्हणतील की, अंतर्गत बॉम्बस्फोट झाले नाहीत. पण, याआधी ही अंतर्गत बॉम्बस्फोट झालेले आहेत. यामध्ये संघाच्या कार्यकर्त्यांकडे मटेरियल सापडले आहे. याची सखोल चौकशी व्हावी आणि अशा घटना थांबल्या पाहिजेत हे पाहावे,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
“नांदेड, मालेगाव केस, अजमेर केस, मुंबईतील कबुतरखाना, गिरगाव, फर्ग्युसन कॉलेज, याठिकाणी ब्लास्ट झाले पण यामागे कोण आहे हे अजून माहिती नसलेले अंतर्गत ब्लास्ट आहे. एवढे जर न उलगडलेले आणि ज्याचा तपास लागलेला नाही असे ब्लास्ट असतील तर हे गंभीर आहे,” असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले .
४) राजकारण करू नये; नाना पटोलेंच्या टिकेला बावनकुळेंचं उत्तर
काँग्रेसचे नते नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या टीकेला भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. बावनकुळे म्हणाले, नाना पटोलेंनी समजून घेतलं पाहिजे ३ हजार किलोच्या वर आरडीएक्स… किती मोठं षडयंत्र होतं. हे षडयंत्र पकडण्यात आलं आणि त्यातून ही घटना घडली आहे आणि ही घटना दुर्दैवी आहे. मृत्यू झाले त्याबद्दल प्रचंड वेदना आम्हाला आहे. पण या घटनेतून त्या दहशतवाद्यांपर्यंत पोहचण्यासाठी सरकार काम करत आहे. घटना घडू नये आणि घडली तर शोध घेऊन त्या आरोपीला जेरबंद करणे आणि पुन्हा अशी घटना होणार नाही याची काळजी सरकार घेत आहे. पंतप्रधान मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शाह या घटनेचे मॉनिटरिंग करत आहेत. नाना पटोलेंनी या घटनेचं राजकारण करू नये. या घटनेचं राजकारण होऊ नये, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की देशावर हल्ला होतो त्यावर त्यांना ठेचून काढलं पाहिजे. सर्व पक्षांनी मिळून ठेचून काढलं पाहिजे.
५) “सगळ्या फाईल मी हळूहळू बाहेर काढणार”, अंजली दमानियांचा अजित पवारांना इशारा
पार्थ पवारांच्या पुण्यातील जमीन खरेदी गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर आज समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजपा नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, “हायकोर्टाकडे अपील करून सिंचन घोटाळा, महाराष्ट्र कोऑपरेटीव्ह बँक घोटाळा, जरांगेश्वर घोटाळा याच्या सगळ्या फाईल मी हळूहळू बाहेर काढणार आहे. यावेळेस मी ठरवलं आहे की सिंचन घोटाळ्यातून फडणवीसांनी तुम्हाला सोडवलं, पण यापुढच्या कुठल्याही घोटाळ्यात तुम्हाला फडणवीस काय, अमित शाह, मोदी कोणाकडेही जा, मी कोर्टाकडून ऑर्डर घेऊन एकाही केसमधून बाहेर येऊ देणार नाही, याची खात्री बाळगा.”
आत्ताच्या घटकेला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सरकारने जे ४२ कोटी रुपये देऊन तो व्यवहार रद्द करण्याबद्दल जी नोटीस काढली आहे, तीच मुळात चुकीची आहे. सध्या तो अधिकार महसूल विभागाकडे नाही, सिव्हील कोर्टच ते आदेश देऊ शकते. त्यामुळे आता जे सांगितलं जात आहे की चोरीचा माल परत दिला आणि चोरी झालीच नाही , हा व्यवहार रद्द, तर तसं अजिबात नाही, याबाबत मोठा खुलासा मी उद्या करणार आहे, असेही दमानिया म्हणाल्या.
