scorecardresearch

महाराष्ट्राने ‘सीएनजी’चे भाव कमी केले, केंद्राने वाढवले – नाना पटोले

“राज्य सरकारांवर खापर फोडण्याऐवजी केंद्र सरकारने आत्मचिंतन करावे”, असा सल्ला देखील मोदी सरकारला दिला आहे.

(संग्रहीत)

केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ केल्याने सीएनजीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. शिवाय, राज्य सरकारवर केंद्रकाडून केल्या जाणाऱ्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिलं आहे.

“महाराष्ट्र सरकारने सीएनजीवरील वॅट १३.५ टक्क्यांवरुन घटवून ३ टक्क्यांवर आणला. पण केंद्रातील भाजपा सरकारने याच काळात सीएनजीच्या दरात ३० रुपयांनी वाढ करुन जनतेला मिळणाऱ्या दिलाशाच्या मार्गात अडथळा आणला.” अशा शब्दांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे.

तसेच, “महागड्या पेट्रोलियम उत्पादनांवरुन राज्य सरकारांवर खापर फोडण्याऐवजी केंद्र सरकारने आत्मचिंतन करावे.” असा सल्ला देखील नाना पटोलेंनी दिला आहे.

१ एप्रिल रोजी महाराष्ट्र सरकारने सीएनजीवरील व्हॅटमध्ये मोठी कपात केली होती. हे दर १३ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणले. यामुळे किंमतींमध्येही मोठी घसरण झाली. मात्र, त्याच दिवशी केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या किमती १०० टक्क्यांहून अधिक वाढवल्या होत्या, त्यानंतर सीएनजी आणि पीएनजीची इनपुट कॉस्टही वाढली होती आणि कंपन्यांनी त्यांच्या किरकोळ किमतीही वाढवल्या.

यानंतर सीएनजीच्या किमतीत ३० एप्रिलपासून प्रतिकिलो चार रुपये दरवाढ करण्याचा निर्णय महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून घेण्यात आला. देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूच्या किंमतीत भारत सरकारने १ एप्रिलपासून ११० टक्के वाढ केलेली आहे. त्यामुळे एमजीएलकडून खरेदी केल्या जाणाऱ्या गॅसच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजीच्या किमतीत वाढ झाली असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ झाल्यामुळे एमजीएलने अशा वाढलेल्या गॅसच्या किमती हळूहळू वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३० एप्रिल पहाटेपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (सीएनजी) किमतीमध्ये प्रतिकिलो चार रुपयांनी वाढ झालेली आहे. सीएनजीच्या सर्व करांसह मुंबई आणि आसपास प्रतिकिलोचा दर ७६ रुपये असेल. मात्र, देशांतर्गत पीएनजीच्या किमतीत कोणतीही वाढ होणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra reduced cng prices center increased nana patole msr

ताज्या बातम्या