महाराष्ट्रातील संशयित इबोला रुग्णांसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र वॉर्डची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील वसई येथे राहणारे ललित कुमार काही दिवसांपूर्वी नायजेरियाच्या लागोस भागातून भारतात परतले होते. भारतामध्ये आल्यानंतर त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयाने ललित कुमार यांना इबोलाची लागण झाल्याच्या संशयावरून पुर्णपणे खबरदारी घेण्याचे ठरवले आहे. त्यानुसार अन्य रुग्णांना इबोलाची लागण होऊ नये यासाठी रुग्णालयाच्या प्रशासनाने त्यांच्यावर स्वतंत्र वॉर्डात उपचार करण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी पुण्यातील राष्ट्रीय वायरॉलॉजी विभागाकडे पाठवण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी दिली. इबोलाग्रस्त रुग्णाशी खुपच जवळचा संबंध आल्यास या रोगाची लागण होऊ शकते. सध्यातरी राज्यातील नागरिकांनी इबोलामुळे घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
सध्या या रोगाने आफ्रिकी देशांमध्ये थैमान घातले आहे. आतापर्यंत पश्चिम आफ्रिकेतील पापुआ न्यू गिनी देशात ३९३, लिओनात २८६ तर लायबेरिया आणि नायजेरिया या देशांमध्ये तब्बल २८२ जण इबोलामुळे मृत्युमुखी पडले आहेत.