Maharashtra Speaker Rahul Narwekar on Gopichand Padalkar Jitendra Awhad Clash : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमधील वादानंतर अखेर विधानसभा अध्यक्षांनी कारवाई केली आहे. विधिमंडळ सभागृह सुरक्षा समितीच्या अहवालानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही आमदारांना खेद व्यक्त करण्याच्या सूचना केल्या. तसेच विधान भवनात राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यासह आता विधान भवनातील सामान्यांच्या, कार्यकर्त्यांच्या प्रवेशाबाबत नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, “विधिमंडळातील सर्व सदस्यांनी सभागृहात व सभागृहाच्या बाहेर वर्तनाची उच्च मानके पाळणे आवश्यक आहे. सदस्यांचं वर्तन विधिमंडळाची प्रतिमा वाढवण्यासारखं असावं. सभागृहाच्या उच्च परंपरा, प्रथा, प्रतिष्ठा बाधित होतीलल असं वर्तन कुठल्याही सदस्याने करू नये. विधिमंडळ हे लोकशाहीचं मंदिर आहे असं संबोधलं जातं. अशा पवित्र ठिकाणी सर्वांनीच विशिष्ट संकेतांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे. लोकांचा लोकशाहीवरील विश्वास दृढ राहावा असं वर्तन सदस्यांनी करणे अपेक्षित आहे.”

नार्वेकर म्हणाले, “आमदारांच्या नैतिक आचरणाचे उच्च मापदंड राखण्यासाठी लोकसभेच्या धर्तीवर नीतिमूल्य समिती अर्थात एथिक्स कमिटी गठीत करण्याचा निर्णय विचाराधीन आहे. लवकरच मी विधान परिषदेच्या सभापती महोदयांशी विचार विनिमय करून याबाबतचा निर्णय घेईन. सर्व पक्षांच्या गटनेत्यांशी संपर्क साधून यासंदर्भातील निर्णय एका आठवड्याच्या आत घेतला जाईल. संसदेत जी एथिक्स कमिटी आहे तिच्याकडे विस्तृत अधिकार आहेत. त्यामुळे या एथिक्स कमिटीने यापूर्वी खासदारांचं केवळ निलंबनच नव्हे तर त्यांचा सदस्यत्वही रद्द करण्याची भूमिका घेतली आहे. ही समिती गठीत झाल्यानंतर सदस्यांना तिची गांभीर्याने नोंद घ्यावी लागेल.”

अधिवेशन काळात विधान भवनात केवळ सदस्य व स्वीय सहाय्यकांनाच प्रवेश

“गेल्या काही दिवसांमध्ये विधिमंडळ सदस्यांबाबत ज्या घटना घडल्या आहेत त्यामुळे विधानमंडळ सदस्यांप्रती लोकांच्या मनात अनादर निर्माण होतोय की काय अशी शंका माझ्या मनात निर्माण झाली आहे. विधान भवनाच्या उच्च प्रथा-परंपरांचं पालन करणे ही आपली घटनात्मक जबाबदारी आहे. शेवटी आपले उत्तरदायित्व हे संविधानाशी आहे. विधानमंडळासह सर्व संस्था संविधानातून निर्माण झाल्या आहेत. विधानमंडळातील सदस्य म्हणून शपथ घेताना आपण कायद्याद्वारे स्थापन भारताच्या संविधानाबाबत खरी श्रद्धा व निष्ठा बाळगण्याची व आपलं कर्तव्य निष्ठेने पार पाडण्याची शपथ घेतली आहे. त्या शपथेचे गंभीरपणे पालन करणे अपेक्षित आहे. मी जाहीर करतोय की विधानमंडळ परिसरात अधिवेशन कालावधीत यापुढे केवळ सदस्य, त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यक आणि शासकीय अधिकारी यांनाच प्रवेश दिला जाईल. इतर अभ्यातांना प्रवेश दिला जाणार नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्र्यांना विधान भवनातील दालनात बैठका घेता येणार नाही : नार्वेकर

विधानसभा अध्यक्ष म्हणाले, “बऱ्याच वेळा मंत्री विधानभवनातील त्यांच्या दालनात वेगवेगळ्या बैठका आयोजित करत असतात. त्यासाठी अभ्यागतांना प्रवेश देण्याची विनंती केली जाते. अशा मंत्र्यांना हे सभागृह सूचित करत आहे की तुमचे ब्रीफिंग व बैठका मंत्रालयातील तुमच्या दालनात घ्याव्यात. अपवादात्मक परिस्थितीत विधानसभेचे अध्यक्ष व विधान परिषदेच्या सभापती यांचा समावेश असलेल्या मंडळाची मान्यता घेतल्याशिवाय कुठल्याही मंत्री महोदयाला विधान मंडळातील दालनात बैठक घेण्याची अभ्यागतांना प्रवेश देण्याची परवानगी दिली जाणार नाही.”